Pakistan PM Shehbaz Sharif blames India Afghanistan for islamabad-bombing : पाकिस्तानमध्ये मंगळवारी झालेल्या एका आत्मघातकी बॉम्बस्फोटात १२ जण ठार झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी गट तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) ने स्वीकारली आहे. असे असले तरी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मात्र या भीषण हल्ल्याबाबत भारतावर आरोप केला आहे.

शरीफ यांनी या हल्ल्याच्या पाठीशी असलेल्यांचा “भारताद्वारे प्रायोजित दहशतवादी प्रॉक्सीज” असे म्हणत त्यांचा निषेध केला आहे. “हे हल्ले पाकिस्तानला अस्थिर करण्यासाठी करण्यात येत असलेल्या भारत सरकार प्रायोजित दहशतवादाचा पुढील भाग आहेत,” असेही शरीफ म्हणाले. पाकिस्तानातील वृत्तसंस्था असोसिएटेड प्रेस ऑफ पाकिस्तान (APP)ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

भारताकडून ११ नोव्हेंबर रात्री ७.३० वाजेपर्यंत या आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. मात्र, भारताने यापूर्वीही पाकिस्तानकडून करण्यात आलेले असे दावे फेटाळून लावले आहेत.

शरीफ यांनी कोणताही पुरावा न देता असाही दावा केला आहे की याच अफगाणिस्तानातून चालवल्या जाणाऱ्या नेटवर्कने वाना येथे लहान मुलांवर हल्ला केला होता. अफगाणिस्तानला लागून असलेल्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील वाना येथील कॅडेट कॉलेजबाहेर झालेल्या हल्ल्याचा संदर्भ देत शरीफ बोलत होते.. या हल्ल्यात तीन लोकांचा मृत्यू झाला. सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला देखील बंदी घालण्यात आलेल्या तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानकडून करण्यात आला होता.

गव्हरमेंट ऑफ पाकिस्तान या एक्स खात्यावर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये शरीफ यांनी असाही दावा केला आहे की, मंगळवारी राजधानी इस्लामाबादमध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्याचे मूळ हे अफगाणिस्तानात असून, तो हल्ला भारताच्या पाठिंब्याने करण्यात आला. हिदुस्तान टाईम्सने यासंबंधी वृत्त दिले आहे.

पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर सशस्त्र गटांना विशेषतः टीटीपी किंवा पाकिस्तानी तालिबानला आश्रय दिल्याचा आरोप सातत्याने केला जातो, ज्यांच्याकडून देशात हल्ले केले जातात. अफगाण तालिबानने मात्र अशा गटांना आश्रय दिल्याचा आरोप फेटाळून लावला आहे.

“अफगाण भूमीवरून भारताच्या छत्राखाली केल्या जाणाऱ्या अशा प्रकारच्या हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी कोणताही शब्द पुरेसे नाहीत,” असे शरीफ म्हणाल्याचे वृत्त एपीपीने दिले आहे.

राजधानी इस्लामाबादमधील जी-११ ज्युडिशीयल कॉम्प्लेक्सजवळ मंगळवारी हा हल्ला झाला. शरीफ म्हणाले की अशा प्रकारचे हल्ले दहशतवादाला मुळापासून उखडून टाकण्याच्या पाकिस्तानच्या ध्येयाला धक्का पोहचवू शकत नाहीत.