Pakistan PM Shehbaz Sharif Claims on US Iran Peace Deal : पश्चिम आशियातील संघर्षावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता कराराच्या अनेक मुद्द्यावर सहमती झाल्याचा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केला. तसेच आगामी २४ तासांत या करारावर इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी होणार असल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. पाकिस्तान सध्या या स्वाक्षरी प्रक्रियेची तयारी करत असून, त्यानंतर पुढील आठवड्यात तांत्रिक पातळीवरील वाटाघाटी सुरू होतील. त्यामध्ये इराणच्या अणुकार्यक्रमाच्या भवितव्यासह कराराच्या इतर सविस्तर मुद्द्यांवर सखोल चर्चा केली जाईल, असे शाहबाज शरीफ यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून केलेल्या पोस्टमध्ये नमूद केले.

अमेरिका-इराण युद्ध २४ तासांत थांबणार?

२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्त हल्ला केल्यानंतर पश्चिम आशियातील तणावाला सुरुवात झाली होती. या युद्धात आतापर्यंत अनेक निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमावावे लागले. त्याशिवाय जागतिक तेल पुरवठ्यासाठी महत्वाची मानली जाणारी होर्मुझची सामुद्रधुनीदेखील प्रभावित झाली. परिणामी आंतराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक देशांवर इंधनटंचाईचे संकट निर्माण झाले. यादरम्यान दोन्ही देशांमधील वाद कायमस्वरुपी मिटवण्यासाठी पाकिस्तानने केलेली मध्यस्थी यशस्वी झाल्याचा दावा पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केला आहे. पश्चिम आशियातील संघर्षाला पूर्णविराम देण्यासाठी शांतता कराराच्या चौकटीवर सहमती दर्शविली असून कराराचा अंतिम मसुदा तयार झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे शांतता करार पूर्ण झाल्यास हा जागतिक मुत्सद्देगिरीतील सर्वात मोठा ऐतिहासिक विजय मानला जाईल.

शाहबाज शरीफ नेमके काय म्हणाले?

अमेरिका आणि इराण यांच्यातील शांततेच्या करारासाठी वाटाघाटी निश्चित करण्यात आल्याचा दावा शाहबाज शरीफ यांनी केला. तसेच, पुढील २४ तासांत त्यावर ई-स्वाक्षरी होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्ती केली. दोन्ही देशांतील वाद मिटवण्यासाठी पाकिस्तानने सातत्याने मध्यस्थी भूमिका बजावल्याचे शरीफ यांनी नमूद केले. मात्र, यापूर्वीही शांतता कराराबाबत अनेकदा सकारात्मक संकेत देण्यात आले होते; पण प्रत्यक्षात अमेरिका आणि इराणनेही त्यावर कोणतीही सहमती दर्शवली नव्हती. शरीफ यांनी केलेल्या सध्याच्या दाव्यालाही दोन्ही देशांनी अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

Pakistan PM Shehbaz Sharif says US-Iran peace deal signing expected within 24 hours
अमेरिका आणि इराण यांच्यातील शांततेच्या करारासाठी वाटाघाटी निश्चित करण्यात आल्याचा दावा शाहबाज शरीफ यांनी केला.

अमेरिका-इराण करारात नेमके काय?

डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने जागतिक माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, प्रस्तावित कराराचा पहिला टप्पा संघर्ष थांबविणे आणि होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करणे यावर केंद्रित असेल. त्यानंतर अधिक गुंतागुंतीच्या मुद्द्यांवर चर्चा होईल. करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर पुढील ६० दिवस इराणच्या अणुकार्यक्रमाशी संबंधित तांत्रिक मुद्द्यांवर वाटाघाटी केल्या जातील. त्यामध्ये इराणकडे असलेल्या उच्च दर्जाच्या समृद्ध युरेनियमच्या साठ्याचे हस्तांतरण किंवा नष्टीकरण यासारख्या बाबींचा समावेश असेल. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनीही अणुकार्यक्रमासंबंधीचे अंतिम निर्णय पुढील चर्चेच्या टप्प्यात घेतले जातील, असे संकेत दिले असून आवश्यक असल्यास चर्चेची मुदत वाढविण्यात येऊ शकते, असेही स्पष्ट केले आहे. दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यात राजनैतिक पातळीवर सकारात्मक हालचाली सुरू असतानाही आखातातील तणाव अद्यापही काय आहे.

कोणते मुद्दे अजूनही अनिर्णित आहेत?

इराणच्या समृद्ध युरेनियम हाताळण्याची अचूक पद्धत, निर्बंध शिथिल करण्याची कालमर्यादा आणि होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांसाठी इराणची प्रस्तावित शुल्क रचना यासह अनेक प्रमुख मुद्द्यांवर अद्याप चर्चा सुरू आहे. या वाटाघाटींमध्ये सहभागी नसलेल्या इस्रायलने देखील संकेत दिले आहेत की, कोणत्याही करारामध्ये इराणची क्षेपणास्त्र क्षमता आणि प्रादेशिक प्रॉक्सी गटांच्या (लष्करी गट) चिंतेवर लक्ष दिले जाणे आवश्यक आहे. हे प्रश्न अद्याप सुटलेले नसले तरी, दोन्ही बाजूंच्या अधिकाऱ्यांनी संकेत दिले आहेत की गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत आता करार होण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हा करार यशस्वी ठरणार की तणाव आणखीनच वाढणार, याकडे सगळ्या जगाचे लक्ष लागून आहे.