न्यूयॉर्क : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची समाजमाध्यमावरील पोस्ट तयार करण्यात अमेरिकेचे ‘व्हाइट हाऊस’ थेट सहभागी होते. या पोस्टमध्ये शरीफ यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणसाठी दिलेली ७ एप्रिलची मुदत दोन आठवड्यांनी वाढवण्याची कळकळीची विनंती केली होती, असे माध्यम अहवालात म्हटले आहे.
‘न्यूयॉर्क टाइम्स’ने (एनवायटी) म्हटले आहे की, मंगळवारी शरीफ यांनी ‘एक्स’वर प्रसृत केलेल्या संदेशाचे स्वरूप ठरवण्यात व्हाईट हाऊसचा थेट सहभाग होता. या पोस्टमध्ये शरीफ यांनी लिहिले होते की, ‘पश्चिम आशियात सुरू असलेले युद्ध थांबविवण्यासाठीचे राजनैतिक प्रयत्न सातत्याने आणि जोरदारपणे सुरू आहेत, नजीकच्या काळात त्याचे ठोस परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.’ ‘राजकीय प्रक्रियेला पूर्ण वाव देण्यासाठी मी अध्यक्ष ट्रम्प यांना कळकळीची विनंती करतो की त्यांनी ही मुदत (डेडलाईन) दोन आठवड्यांसाठी वाढवावी,’ असे शरीफ म्हणाले.
शरीफ यांनी त्याचवेळी इराणलाही विनंती केली की, सदिच्छा म्हणून त्यांनी होर्मुझची सामुद्रधुनी दोन आठवड्यांसाठी खुली करावी. ‘दीर्घकालीन प्रादेशिक शांतता आणि स्थिरतेसाठी आम्ही सर्व युद्धरत पक्षांना दोन आठवड्यांचा युद्धविराम पाळण्याचे आवाहन करतो, जेणेकरून चर्चेद्वारे युद्धाची कायम अखेर करता येईल,’ असेही त्यांनी नमूद केले.
पाकिस्तानच्या हेतूंवर शंका
जेरुसलेम : अमेरिका आणि इराणमध्ये मध्यस्थाची भूमिका बजावणार्या पाकिस्तानच्या हेतूंवर इस्रायलने शंका उपस्थित केली आहे. ‘पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी इस्रायलच्या सर्वनाशाचे केलेले आवाहन संतापजनक आहे,’ अशी प्रतिक्रिया इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने व्यक्त केली. ‘असा देश एक तटस्थ मध्यस्थ कसा असू शकतो,’ असा प्रश्न त्यात उपस्थित केला आहे.
‘अशा प्रकारचे कुठलेही वक्तव्य कुठल्याही सरकारकडून खपवून घेतले जाणार नाही,’ असे इस्रायलने म्हटले आहे. ख्वाजा आसिफ यांनी ‘इस्लामाबादमध्ये शांततेबाबत चर्चा होत असताना इस्रायलने लेबनॉनमध्ये नरसंहार केला,’ अशी टिप्पणी केली होती.
ट्रम्प यांच्यासारखीच भाषाशैली
अमेरिका आणि इराण बुधवारी दोन आठवड्यांच्या सशर्त युद्धविरामावर सहमत झाले. याला ‘शेवटच्या क्षणी केलेली सार्वजनिक विनंती’ असे संबोधताना ‘एनवायटी’च्या अहवालात म्हटले की, ट्रम्प यांनी इराणला दिलेली रात्री आठची मुदत संपत आली होती आणि पाकिस्तान दोन्ही बाजूंसाठी तोडगा काढण्याचा प्रयत्न करत होता. अहवालानुसार, ‘यासाठीच पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी समाज माध्यमाचा आधार घेतला.’
शरीफ यांनी त्यांच्या पोस्टमध्ये ट्रम्प आणि त्यांच्या वरिष्ठ सल्लागारांना ‘टॅग’ केले होते. ‘एनवायटी’ने असेही निरीक्षण नोंदवले की, शरीफ यांनी मंगळवारी दुपारी ही पोस्ट लिहिताना ट्रम्प यांच्यासारखीच भाषाशैली वापरली होती. परंतु पडद्यामागे, शरीफ यांनी पोस्ट करण्यापूर्वीच ‘व्हाईट हाऊस’ने हा संदेश पाहिला होता आणि त्याला मंजुरी दिली, असे या संवादाची माहिती असलेल्या एका व्यक्तीच्या हवाल्याद्वारे ‘एनवायटी’ने म्हटले आहे.
इराणच्या माजी परराष्ट्रमंत्र्यांचे निधन
दुबई : इराणचे माजी परराष्ट्रमंत्री कमल खराझी यांचे गुरुवारी रात्री उशिरा निधन झाले. अमेरिका-इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये ते जखमी झाले होते. इराणच्या सरकारी माध्यमांनी ही माहिती दिली. इराण अण्वस्त्रे विकसित करण्याचा विचार करू शकतो, असे त्यांनी म्हटले होते. दिवंगत सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचे परराष्ट्र धोरण सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले होते.
