Donald Trump On India Pakistan Clash: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्यावर्षी झालेला संघर्ष मी थांबवला असा दावा करणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता नवीन खुलासे केलेत. मी मध्यस्थी केली नसती तर भारत – पाकमध्ये अणुयुद्ध झाले असा नवा दावा ट्रम्प यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर कदाचित पाकिस्तानचे पंतप्रधान मारले गेले असते असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?

“मी मध्यस्थी केली नसती तर पाकिस्तानचे पंतप्रधान (शाहबाज शरिफ) मारले गेले असते असे ३५ दशलक्ष लोक म्हणाले. पदभार स्वीकारल्यापासून पहिल्या १० महिन्यात मी भारत – पाकिस्तानसह आठ युद्ध थांबवली”, असे ट्रम्प म्हणाले. पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवादी तळांना ऑपरेशन सिंदूर राबवत लक्ष्य केले होते.

स्टेट ऑफ द युनियनमध्ये भाषण

ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या स्टेट ऑफ द युनियन भाषणात त्यांनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली. ऑपरेशन सिंदूर सुरु असताना ३५ दशलक्ष नागरिकांचे जीव धोक्यात होते, असे ट्रम्प म्हणाले. गेल्यावर्षी मे महिन्यात भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष झाला. भारताच्या ऑपरेशन सिंदूरला उत्तर म्हणून पाकिस्तानकडून देखील हल्ला करण्यात आला होता. दरम्यान, ट्रम्प यांनी त्यांनी मध्यस्थी केल्यामुळे युद्ध थांबल्याचा दावा केला होता. त्यानंतर जागतिक स्तरावर त्यांच्याकडून वारंवार हा दावा केला जातो.

कोणती आठ युद्ध थांबवल्याचा दावा?

ट्रम्प यांनी भाषणात आठ युद्ध थांबवल्याचा दावा केला आहे. यामुळे इस्त्रायल – हमास, इस्त्रायल – इराण, इजिप्त आणि इथोपिया, भारत – पाकिस्तान, सर्बिया आणि कोसोवो, रवांडा आणि काँगो, अर्मेनिया आणि अझरबैजान आणि कंबोडिया आणि थायलंड यांच्यातील संघर्ष माझ्यामुळे थांबला असा दावा ट्रम्प यांनी केला आहे.