किर्गिझस्तानची राजधानी बिश्केक या ठिकाणी शांघाय सहकार्य संघटनेची (SCO) शिखर परिषद पार पडली आहे. या एससीओ शिखर परिषदेला रशिया, चीन, भारत, पाकिस्तानसह आदी देशांचे पंतप्रधान आणि अध्यक्ष उपस्थित होते. या परिषदेदरम्यान विविध जागतिक मुद्यांवर चर्चा पार पडली आहे. या बरोबरच अनेक देशांच्या नेत्यांशी द्विपक्षीय चर्चाही झाल्या आहेत.
या एससीओ शिखर परिषदेनंतर सर्व देशांच्या नेत्यांचं एकत्रितरित्या फोटोसेशन पार पडलं. या फोटोसेशनमधील फोटोही समोर आले आहेत. मात्र, पाकिस्तानने केलेल्या एका हास्यास्पद कृतीची मोठी चर्चा रंगली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या कार्यालयाकडून एससीओ शिखर परिषदेतील फोटो एक्सवर शेअर करण्यात आले आहेत. मात्र, या फोटोमधून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वगळण्यात आला आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
नेमकं काय घडलं?
पाकिस्तानने आपल्या नेहमीच्या स्वभावाला साजेसं असं वर्तन पुन्हा एकदा केल्याचं यावरून दिसून येत आहे. पाकिस्तानी पंतप्रधानांच्या कार्यालयाच्या एक्स (ट्विटर) हँडलवर एक ‘क्रॉप’ केलेला फोटो शेअर करण्यात आला आहे. हा फोटो एससीओ शिखर परिषदेतील असून या फोटोमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो वगळण्यात आला आहे.

पाकिस्तानी पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून शेअर करण्यात आलेल्या फोटोत एससीओ शिखर परिषदेला उपस्थित असलेल्या सर्व राष्ट्रप्रमुखांचा समावेश नाही. त्यामुळे यावरून पाकिस्तानचं खरं रूप पुन्हा एकदा जगासमोर आलं आहे. पाकिस्तानच्या या हास्यास्पद कृतीनंतर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
भारताने शेअर केला पूर्ण फोटो
एससीओ शिखर परिषदेनंतर सर्व देशांच्या नेत्यांचं एकत्रितरित्या फोटोसेशन पार पडलं. या फोटोसेशनमधील फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स (ट्विटर) हँडलवर शेअर केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एससीओ शिखर परिषदेला उपस्थित असलेल्या सर्व राष्ट्रप्रमुखांचा समावेश असलेला फोटो शेअर केला आहे.
SCO परिषदेतील पाकिस्तानी पंतप्रधानांच्या कृतीचा व्हिडीओ व्हायरल
एससीओ शिखर परिषदेमध्ये सर्व देशांच्या नेत्यांनी फोटोसेशन केलं. या फोटो सेशननंतर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे पुढे निघून जाताना व्हिडीओत दिसत आहेत, तर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे पाठिमागून घाई-घाईने जाऊन व्लादिमीर पुतिन यांचा हात धरत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत त्यांच्याशी संवाद साधताना दिसत आहेत. त्यानंतर शाहबाज शरीफ आणि व्लादिमीर पुतिन हे दोघे काही क्षण एकत्र उभे राहिले आणि त्यांनी थोडक्यात संवाद साधला. त्यानंतर ते दोघेही पुढे निघून जाताना व्हिडीओत दिसून आले. एससीओ शिखर परिषदेमधील पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या या कृतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
