पाकिस्तानची सध्याची परिस्थिती खूप हलाखीची झाल्याचं बोललं जातं. तेथे सर्वसामान्य जनतेला जीवनावश्यक वस्तू घेणंही मुश्किल होत चाललं आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानी नेत्यांकडून भारताविरोधात वक्तव्य केली जात असल्याचं अनेकदा पाहायला मिळालेलं आहे. यातच आता पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे.

‘पाकिस्तानातील हिंदू हे भारतातील हिंदूंपेक्षा अधिक आनंदी आहेत. कारण पाकिस्तानी मुस्लिम त्यांच्याबाबत सहनशीलता बाळगतात’, असं वक्तव्य आसिफ अली झरदारी यांनी पाकिस्तानच्या एका कार्यक्रमात बोलताना केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओही समोर आला आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

आसिफ अली झरदारी यांनी काय म्हटलं?

“भारतीयांचा दृष्टिकोन वेगळा आहे. भारतीय अखंड भारतावर विश्वास ठेवतात. मात्र, त्यामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या ते विसरले आहेत. आम्ही मुस्लिम आहोत, ते नाहीत. पण आम्ही अशा मानसिकतेचे मुस्लिम आहोत की आम्ही ३-४ टक्के हिंदूंबाबत सहनशीलता बाळगतो. त्यामुळे ते इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा या ठिकाणी अधिक मुक्त आणि सुस्थितीत आहेत. त्यामुळे ते त्यांच्याबरोबर राहण्यापेक्षा आमच्याबरोबर राहणं अधिक पसंत करतात”, असं आसिफ अली झरदारी यांनी म्हटलं.

“आम्ही असे मुस्लिम आहोत जे इतरांबद्दल सहिष्णुता दाखवतो. पाकिस्तानच्या लोकसंख्येपैकी ४ टक्के लोक हिंदू आहेत. त्यांना इतर कोणत्याही ठिकाणाप्रमाणे या ठिकाणीही पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यामुळे भारतात राहण्यापेक्षा आमच्याबरोबर राहणं त्यांना अधिक पसंत पडेल”, असं झरदारी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आसिफ अली झरदारी यांचं हे वक्तव्य अशा वेळी समोर आलं आहे, जेव्हा आंतरराष्ट्रीय स्थरावर अनेक वेगवेगळ्या व्यासपीठांवर पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची दुरवस्था आणि मानवी हक्क यांबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत.