गेल्या वर्षी जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. यानंतर आता पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी भारत आणखी एका युद्धाची तयारी करत असल्याचा दावा केला आहे.
संसदेच्या संयुक्त अधिवेशनात बोलताना पाकिस्तानी नेते झरदारी यांनी असा दावा केला की भारत पाकिस्तानबरोबर पुन्हा आणखी एका युद्धाची तयारी करत आहे. तसेच हा दावा केल्यानंतर, झरदारी यांनी भारताबरोबर शांततापूर्ण वाटाघाटी आणि चर्चेचे आवाहन केले.
विरोधी पक्षाच्या गोंधळादरम्यान संसदेच्या संयुक्त अधिवेशनात बोलताना झरदारी म्हणाले, ‘भारताचे नेते म्हणत आहेत की ते पुन्हा एका युद्धाची तयारी करत आहेत. आयुष्यभर प्रादेशिक शांततेचा एक पुरस्कर्ता म्हणून, मी तसे न करण्याचा सल्ला देईन.”
“माझा त्यांना (भारत) संदेश आहे की युद्धापासून दूर जाऊन अर्थपूर्ण वाटाघाटी कराव्यात, कारण प्रादेशिक सुरक्षेसाठी तोच एकमेव मार्ग आहे,” असे झरदारी म्हणाले. दरम्यान त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडीओच्या सत्यतेची पुष्टी अद्याप होऊ शकलेली नाही.
सिंधू जल कराराला स्थगिती देण्याच्या भारताच्या निर्णयावर झरदारी यांनी टीका केली. त्यांनी या निर्णयाला ‘हायड्रो-टेररिझम’ म्हणत राजकीय दबावासाठी भारत पाण्याचा एखाद्या शस्त्राप्रमाणे वापर करत असल्याचा आरोप केला.
मे २०२५ मध्ये भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले होते. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात चार दिवसांचा लष्करी तणाव निर्माण झाला होता. पाकिस्तानच्या लष्कराने याला ड्रोन हल्ल्यांद्वारे प्रत्युत्तर दिले, ज्यामुळे भारताला नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर ब्लॅकआउट लागू करावा लागला होता.
२२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ ही लष्करी मोहिम हाती घेतली. पहगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. भारत सरकारने या हल्ल्यासाठी पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाची उपशाखा असलेल्या ‘द रेजिस्टन्ट फ्रंट’ (TRF) या संघटनेला जबाबदार धरले आहे.
