काँग्रेस,आपची निदर्शने
पठाणकोट येथे दोन जानेवारीला लष्कराच्या हवाई तळावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात तपासासाठी पाकिस्तानचे पाच सदस्यीय पथक येथे आले आहे, त्यात आयएसआयच्या एकाचा समावेश आहे. या पथकाने हवाई तळाला भेट दिली. दहशतवाद्यांनी भिंती ओलांडून प्रवेश करताना हवाई तळावर हल्ला केला होता तेथेच वेगळे प्रवेशद्वार आता केले आहे. दरम्यान, पाकिस्तानी पथकाचे आगमन झाले असता काँग्रेस व आमआदमी पक्षाने निदर्शने केली. पाकिस्तानी पथकासमवेत भारताच्या राष्ट्रीय तपास संस्थेचे अधिकारीही पठाणकोटला आले आहेत. पथकाने हवाईतळाच्या मागच्या बाजूने प्रवेश केला, त्यांच्या गाडय़ा उप्पर दोआबा कालव्याजवळ अडवण्यात आल्या, नंतर त्यांनी मिनी बसने प्रवास करीत धूळ भरल्या रस्त्याने सकाळी ११.२० वाजता हवाईतळ गाठला. अधिकाऱ्यांनी सांगितले, की पाकिस्तानी पथकाला गुन्ह्य़ाचे ठिकाण दाखवण्यात आले, तेथे सुरक्षा जवान व दहशतवादी यांच्यात चकमक झाली होती. पाकिस्तानी पथकाने दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणात देशाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. आम आदमी पक्ष व काँग्रेसच्या सदस्यांनी हवाई तळाच्या ठिकाणी पाकिस्तानविरोधी घोषणाबाजी केली व फलकही दाखवले. आपचे दिल्लीतील मंत्री कपिल मिश्रा यांनी सांगितले की, पाकिस्तानी पथकाने हवाईतळाला भेट देणे ही शरमेची बाब आहे. आयएसआय दहशतवादाला पाठिंबा देते असे आपण ३५ वर्षे ओरडत आहोत व आता त्यांनाच आपण भेटीची परवानगी दिली. पाकिस्तानी पथक एनआयए अधिकाऱ्यांसमवेत सीमा सुरक्षा दलाच्या खास विमानाने सकाळी सव्वानऊ वाजता येथे आले व नंतर सहा पांढऱ्या बुलेटप्रुफ एसयूव्ही वाहनातून ते हवाईतळाकडे रवाना झाले. त्यांना पंजाब पोलिस कमांडोजची सुरक्षा होती. जैश ए महंमदचे अतिरेकी बनियाल येथून ज्या चौकीला पार करून आत शिरले त्या ठिकाणीही हे पथक भेट देणार आहे.

पाकिस्तानकडून प्रथमच गांभीर्याने तपास-शहा
पीटीआय, कोलकाता- पाकिस्तानच्या तपास पथकाला पठाणकोट हवाई दलाच्या तळावर तपास करण्याची परवानगी दिल्याबद्दल केंद्र सरकारवर टीका होत असतानाच भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी याप्रकरणी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. दहशतवादी हल्ल्यांचा तपास पाकिस्तान प्रथमच इतक्या गंभीरपणे करीत असल्याचे शहा यांनी म्हटले आहे. पाकिस्तानच्या चौकशी पथकाला मर्यादित क्षेत्रातच तपासाची मुभा देण्यात आली आहे, ही बाब प्रथमच स्पष्ट करीत असल्याचे शहा म्हणाले. त्यांना पटाणकोट हवाई दलाच्या तळावर जाण्याची अथवा लष्कराच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची अनुमती देण्यात आलेली नाही, ते अन्य बाबींचा तपास करणार आहेत, असे शहा म्हणाले. पाकिस्तान प्रथमच इतक्या गंभीरपणे तपास करीत असल्याचे शहा यांनी मान्य केले. हा तपास संपल्यानंतर परिणाम दिसतील, असे शहा म्हणाले. पाकिस्तानचे पथक तपासासाठी आले असता काँग्रेस आणि आपने या वेळी निदर्शने केली.