पीटीआय, इस्लामाबाद

पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या रावळपिंडी जिल्ह्यातील तक्षक्षिला या प्राचीन स्थळी तेथील प्रशासनाने पुनर्बांधणीचे काम सुरू केले आहे. हे काम तातडीने थांबवावे, अन्यथा ‘युनेस्को’च्या वारसा यादीत असलेल्या तक्षक्षिलाचा समावेश धोक्यात असलेल्या जागांच्या यादीत केला जाईल, असा इशारा संयुक्त ‘युनेस्को’ने दिला आहे. पाकिस्तानातील ‘डॉन’ वृत्तपत्राने गुरुवारी यासंबंधी वृत्त प्रसिद्ध केले आहे.

तक्षक्षिलाच्या मोहरा मोरादू आणि सिरकप या दोन ठिकाणी हे पुनर्बांधणीचे काम सुरू करण्यात आले होते. त्या अंतर्गत तेथील भिंतींची उंची वाढवली जात होती. ‘युनेस्को’च्या अधिकाऱ्यांनी अलीकडेच वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत या बांधकामाबद्दल नापसंती व्यक्त केली, अशी माहिती सूत्रांनी दिल्याचे ‘डॉन’च्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. पुनर्बांधणीचा हा प्रकार अनावश्यक हस्तक्षेप असल्याचे ‘युनेस्को’ने म्हटले आहे.

तक्षक्षिला येथील विद्यापीठ नष्ट झाले असले तरी तेथे मध्यपाषाणयुगातील गुहा, बौद्ध स्तूप, एक मदरसा आणि एका मशिदीचे अवशेष आहेत. या अवशेषांमुळे भारतीय उपखंडात गेल्या पाच शतकांपेक्षा जास्त काळातील नागर उत्क्रांतीचा एक आकृतिबंध दिसून असल्याचे ‘युनेस्को’ने नमूद केले आहे. मात्र, पंजाब प्रशासनाने हाती घेतलेल्या कामाला पुनर्बांधणी म्हणणे योग्य नसल्याचा दावा पंजाब पुरातत्व विभागाचे महासंचालक जनरल मलिक झहीर अब्बास यांनी ‘डॉन’शी बोलताना केला.

जागरूक अभ्यागतामुळे ‘युनेस्को’ सावध

पंजाबच्या पुरातत्व विभागाने तक्षक्षिलातील मोहरा मोरादू आणि सिरकप येथे पुनर्बांधणीचे काम हाती घेतले होते. मार्च महिन्यात एका अभ्यागताने यासंबंधीची माहिती आणि छायाचित्रे ‘युनेस्को’मधील पाकिस्तानच्या स्थायी प्रतिनिधींना पाठवली. या कामामुळे या प्राचीन केंद्राचा अस्सलपणा आणि अखंडत्वाला धोका निर्माण होत असल्याची भीती अभ्यागताने व्यक्त केली होती. त्यानंतर ‘युनेस्को’ने पंजाब प्रशासनाशी संपर्क साधला. त्यापाठोपाठ मे महिन्यात ‘युनेस्को’च्या तांत्रिक पथकाने तक्षक्षिला येथे भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांनी तिथे काही बांधकाम झाल्याचे आढळले.