पाकिस्तानमधल्या सिंधच्या मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी होळीच्या शुभेच्छा दिल्या? नेटवर सुरू असलेल्या चर्चांवरुन तरी असंच चित्र दिसत आहे. ४ नोव्हेंबर रोजी संपूर्ण भारतात दिवाळी साजरी करण्यात आली. या प्रसंगी जगभरातील अनेक नेत्यांनी आणि राजकारण्यांनी लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी हार्दिक संदेश पोस्ट केले. तथापि, नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले ते पाकिस्तानच्या सिंध प्रांताच्या मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर खात्यावरून पोस्ट केलेल्या ट्वीटने.

दिवाळीच्या दिवशी, मुख्यमंत्री मुराद अली शाह यांच्या ट्विटर अकाऊंटने त्यांचा एक फोटो शेअर केला होता आणि त्यावर “हॅपी होली” असे लिहिलेले होते. हे ट्विट आता हटवण्यात आले आहे, परंतु नेटिझन्सने त्यापूर्वी पोस्टचा स्क्रीनशॉट काढले होते.

पाकिस्तानस्थित पत्रकार मुर्तझा सोलांगी यांनी आता हटवलेल्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि लिहिले, “पाकिस्तानमधल्या सिंधमध्ये सर्वाधिक हिंदू लोकसंख्या आहे. जर सीएम हाऊस, सिंधमधील कर्मचार्‍यांना दिवाळी आणि होळीमधील फरक कळत नसेल तर परिस्थिती दुःखद आहे.

दिवाळीनिमित्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन, अमेरिकेचे उपाध्यक्ष कमला हॅरिस, इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट, श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे आणि इतर अनेक नेत्यांनी भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.