भारताकडून हिंदी महासागरात सुरू असलेल्या आण्विकीकरणामुळे हिंदी महासागरात धोक्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप पाकिस्तानचे परराष्ट्र सल्लागार सरताज अझीझ यांनी केला. हिंदी महासागरातील भविष्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या परिषदेत ते बोलत होते. यावेळी सरताज अझीझ यांनी लष्करीकरण, संहारक क्षमता असलेल्या शस्त्रांचा प्रसार, क्षेपणास्त्रांच्या क्षमतेत झालेली वाढ आणि विदेशी सैन्याची वाढती क्षमता यामुळे हिंदी महासागरातील शांततेला धोका उत्त्पन्न झाल्याचे म्हटले. तसेच हिंदी महासागरातील चाचेगिरी, अवैध मच्छिमारी, अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांची तस्करी, सागरी प्रदुषण आणि हवामान बदलाच्या समस्यांविषयी अझीझ यांनी चिंता व्यक्त केली. येत्या काही वर्षांमध्ये या समस्या आणखी तीव्र होतील, असा अंदाजही त्यांनी वर्तविला. सागरी क्षेत्रातील भविष्यातील धोक्यांच्यादृष्टीने आमच्या देशाचे हित जपण्यासाठी व आमच्या क्षमता वाढविण्यासाठी आम्ही जागरूक आहोत. हिंदी महासागरातील घडामोडींकडे दुर्लक्ष करणे आम्हाला परवडणारे नसल्याचेही अझीझ यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी त्यांनी भारताच्या आण्विकीकरणामुळे हिंदी महासागराचा परिसर अस्थिर होत असल्याचा आरोपही केला. पाकिस्तामध्ये १००० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा सागरी किनारा आहे. याशिवाय, आर्थिक क्षेत्रातंर्गत कराची व ग्वादार बंदराचा ३० हजार किलोमीटरचे सागरी क्षेत्र भारतासाठी महत्त्वाचे आहे.पाकिस्तानचा ९५ टक्के व्यापार या भागातून होत असल्यामुळे या परिसरात शांतता ठेवणे आमच्यासाठी प्राधान्याचे आहे. मात्र, या भागातील भारतीय नौदलाची वाढती ताकद आमच्यासाठी चिंतेचा विषय असल्याचेही सरताज अझीझ यांनी स्पष्ट केले.

काही दिवसांपूर्वी सरताज अझीझ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीसाठी भारत-पाक चर्चेत खोडा घातल्याचा आरोप केला होता. आम्ही भारताची दादागिरी खपवून घेणार नाही. निवडणुकीच्या तोंडावर मोदींनी पाकविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दी हे स्वतःला अधिनायक म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहे. निवडणुकीत मोदींची प्रचार मोहीम पाकविरोधी भावनांभोवतीच फिरत होती असे अझीझ यांनी सांगितले. भारतात एकदा निवडणुका संपू द्या, मग भारताचा पाकिस्तानसोबतच्या चर्चेबाबतचा दृष्टीकोनही बदलेल असा दावा त्यांनी केला होता.