पाकिस्तानमधील लाहोरमधील जौहर टाऊन येथील अकबर चौकात मुंबईत झालेल्या २६/११ बॉम्ब हल्ल्यांचा मुख्य सुत्रधार असणाऱ्या हाफिज सईदच्या घराबाहेर २३ जून रोजी मोठा स्फोट झाला. या प्रकरणामध्ये आता पाकिस्तानने भारतावर आरोप केले आहे. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) मुईद यूसुफ यांनी रविवारी केलेल्या आरोपांनुसार २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सुत्रधार आणि जमात-उद-दावाचा प्रमुख असणाऱ्या सईदच्या घराबाहेर झालेल्या स्फोटामध्ये एका भारतीय नागरिकाचा हात होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्तानने काय दावा केला?

पंजाब पोलिसांचे प्रमुख आणि माहिती मंत्री फवाद चौधरी यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना एनएसए यूसुफ यांनी या हल्ल्यामध्ये भारतीय व्यक्तीचा सामावेश असल्याचा दावा केलाय. भारताची गुप्तचर यंत्रणा असणाऱ्या रॉशी या व्यक्तीचा संबंध असल्याचंही सांगण्यात आलं आहे. “या दहशतवाद्यांकडून इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली असून ती फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली. या चाचण्यानंतरच आम्ही हल्ल्यातील मुख्य दहशतवादी आणि हल्ला घडवून आणणाऱ्यांची ओळख पटवलीय,” असं एनएसए यूसुफ यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> हाफिज सईदच्या घराबाहेर पाकिस्तानी लष्करानेच घडवला स्फोट?; कारण ठरली ‘ती’ बाचाबाची

एनएसए यूसुफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, “या हल्ल्याचा कट रचणारा व्यक्ती भारतीय गुतप्तचर यंत्रणा रॉशी (रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनलिसिस विंग) संबंधित असून दुसरा भारतामध्ये आहे, हे तुम्हाला सांगताना आमच्या मनात कोणतीही शंका नाहीय,” असं म्हटलंय. मात्र नक्की ही व्यक्ती कोण आहे याची माहिती यूसुफ यांनी दिली आहे.

इम्रान काय म्हणाले?

पाकिस्तानमधील वेगवेगळ्या यंत्रणांच्या सहकार्याने आमच्याकडे हल्ला घडवून आणणाऱ्यांची खोटी नाव, खरी ओळखपत्रं आणि संक्षयित स्थानकांबद्दलची माहिती आहे, असंही यूसुफ म्हणालेत. या पत्रकार परिषदेनंतर पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विटरवरुन, या बॉम्बस्फोटाचा तपास करणाऱ्या यंत्रणांनी आज देशाला यासंदर्भातील तपासाची माहिती देण्याचे निर्देश मीच दिले होते. तसेच देशातील नागरिक आणि लष्कराशीसंबंधित गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने दहशतवादी आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय संबंधांची माहिती समोर आली, असं इम्रान म्हणालेत.

नक्की पाहा >> Video: फाईल्सने हल्ला, शिव्या, आरडाओरड अन्… पाकिस्तानी संसदेतील गोंधळाचे झाले Live टेलिकास्ट

कधी झाला स्फोट?

लाहोरमधील जौहर टाऊन येथील अकबर चौकातील बोर्ड ऑफ रेव्हेन्यू हाऊसिंग सोसायटीमधील सईदच्या घराबाहेर २३ जून रोजी हा बॉम्बस्फोट झाला होता. एका कारच्या मदतीने हा स्फोट घडवण्यात आलेल्या ज्यात तिघांचा मृत्यू झाला आणि २४ जण जखमी झाले. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेनं घेतलेली नाही.

नक्की वाचा >>पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना दिलं जातं पेन्शन; UNHRC मध्ये भारताचा पाकवर हल्लाबोल

भारत काय म्हणाला?

यापूर्वीच भारताने पाकिस्तानमधील बॉम्बस्फोटांमध्ये भारताचा सहभाग असल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाला पाकिस्तानच्या या डावपेचांची माहिती आहे. इस्लामाबादकडून आर्थिक पाठबळ मिळत असल्याचं इतर कोणी नाही तर पाकिस्ताननेच मान्य केल्याचाही टोला भारताने लगावला आहे.

नक्की वाचा >> Coronavirus: भारताच्या मदतीसाठी पाकिस्तानी संस्थांनी गोळा केले कोट्यावधी रुपये दहशतवादी कारवायांसाठी वापरले जाण्याची भीती

कोण आहे सईद?

सईद हा संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेला दहशतवादी आहे. अमेरिकेने त्याच्यावर एक कोटी डॉलर्सच इनाम ठेवलं आहे. तो सध्या दहशतवादी कारवायांना आर्थिक पाठबळ दिल्याच्या पाच प्रकरणांमध्ये शिक्षा भोगत आहे. सईदच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेली जमात-उद-दावा ही दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबाचाच भाग आहे. लश्करने २००८ साली मुंबईमधील हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. यामध्ये सहा अमेरिकन नागरिकांसोबत १६६ जणांनी प्राण गमावले होते. अमेरिकेच्या आर्थिक विभागाने सईदला जागतिक दहशतवादी घोषित केलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने त्याला डिसेंबर २००८ मध्ये दहशतवादी घोषित केलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan says india was behind june bomb blast near hafiz saeed home in lahore scsg
First published on: 05-07-2021 at 08:15 IST