पाकिस्तानमधील पेशावर या शहरात एक भीषण दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. पेशावरमधील एका खासगी शाळेचं छत कोसळून तब्बल २७ विद्यार्थ्यांसह एका शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत ४० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पाकिस्तानमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
पेशावर या ठिकाणी गुरुवारी एका शाळेचं छत अचानक कोसळलं. यावेळी विद्यार्थी वर्गामध्येच होते. हे शाळेचं छत अचानक कोसळलं आणि यामध्ये २७ विद्यार्थ्यांचा आणि एका शिक्षिकेचा मृत्यू झाला. या घटनेत मृत्यू झालेल्या बहुतेक विद्यार्थ्यांचं वय हे १३ वर्षांपेक्षा कमी होतं. ही घटना घडल्यानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आलं असून ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
पेशावर पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की, ही घटना पेशावर शहरातील दिर कॉलनी भागात घडली आहे. या शाळेची इमारत तीन मजली होती. या प्रकरणात आता संबंधित शाळेच्या मालकाला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण घटनेची पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे. या संदर्भातील वृत्त पीटीआयच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
वृत्तानुसार, या शाळेत एकूण ११० मुले शिक्षण घेत होते. ज्या वेळी छत कोसळल्याची घटना घडली तेव्हा वरच्या मजल्यावरील वर्गांमध्ये ३० विद्यार्थी उपस्थित होते. या घटनेत जखमी झालेल्यांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयात आणीबाणीची स्थिती घोषित करण्यात आली आहे. तसेच या घटनेच्या चौकशीचे आदेश स्थानिक प्रशासनाने दिले आहेत. सध्या घटनास्थळावरील ढिगारा हटवण्याचं काम सुरू असून घटनास्थळी बचाव पथके दाखल झालेले आहेत.
पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी काय म्हटलं?
पेशावरमधील एका खासगी शाळेचं छत कोसळून तब्बल २७ विद्यार्थ्यांसह एका शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेवर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं. तसेच पीडित कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त करत सर्व जखमींना वैद्यकीय उपचार मिळतील याची खात्री करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
