ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्या मुकुटात असलेला कोहिनूर हिरा आणण्याचे निर्देश पाकिस्तान सरकारला द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका लाहोर उच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. याच हिऱ्यासाठी भारत सरकारकडूनदेखील वर्षांनुवर्षे प्रयत्न सुरू आहेत.
बॅरिस्टर जावेद इक्बाल जाफरी यांनी न्यायालयात या संदर्भात याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांनी दस्तुरखुद्द महाराणी एलिझाबेथसह पाकिस्तानमधील ब्रिटिश उच्चायुक्तालयाला प्रतिवादी केले आहे. सुरुवातीला ही याचिका दाखल करून घेण्यास न्यायालयाच्या निबंधकांनी आक्षेप घेतले होते. परंतु, ते फेटाळून लावत न्यायमूर्ती खालीद महमूद खान यांनी याचिका दाखल करून घेण्याचे आदेश दिले. हा हिरा पाकिस्ताननिर्मितीपूर्वी अस्तित्वात असलेल्या प्रांताचा भाग होता. पर्यायाने आता त्याची मालकी पाकिस्तानकडेच असायला हवी, अशी मागणी जाफरी यांनी आपल्या याचिकेत केली आहे. यापूर्वी ब्रिटनच्या राणीविरोधातील प्रकरणाची सुनावणी घेणे न्यायालयाच्या कक्षेत येत नसल्याचे सांगत निबंधकांनी त्यांची याचिका दाखल करून घेण्यास नकार दिला होता.
परंतु जर राणीला ब्रिटनमध्ये एखाद्या प्रकरणात प्रतिवादी बनविण्यात आडकाठी येत नसेल, तर पाकिस्तानातील प्रकरणातदेखील का बनविता येऊ नये, असा सवाल करीत आपली याचिका दाखल करून घेण्याची मागणी जाफरी केली. पंजाबचे महाराजा रणजितसिंह यांचे नातू दलिपसिंह यांच्याकडून जबरदस्तीने हा हिरा बळकावण्यात आला आहे. तो परत मिळावा.
कारण, कोहिनूर हा पंजाब प्रांताच्या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग आहे, असे या याचिकेत नमूद करण्यात आले आहे. १९५३मध्ये झालेल्या राज्यारोहण समारंभात १०५ कॅरट वजनाचा कोहिनूर हिरा एलिझाबेथच्या मुकुटात विराजमान झाला होता.