पीटीआय, पेशावर
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात दहशतवाद्यांनी एका पोलीस चौकीवर केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात १५ सुरक्षा सैनिक ठार झाले. त्याशिवाय अनेक जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना बन्नू जिल्ह्यात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस चौकीच्या दिशेने स्फोटकांनी भरलेले एक वाहन येत असल्याचे पाहून सुरक्षारक्षकांनी त्यावर गोळीबार केला. या गोळीबारामुळे मोठा स्फोट झाला. या स्फोटाच्या तीव्रतेने परिसरातील अनेक घरांची छपरे उडाली. पोलीस चौकीची इमारत जमीनदोस्त झाली. त्यात अनेक सुरक्षा सैनिक मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. स्फोटानंतर दहशतवाद्यांच्या गटाने पोलीस चौकीवर हल्ला केला. या हल्ल्यात १५ जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाले.
या गोळीबारात किती दहशतवादी मारले गेले किंवा किती जणांना अटक करण्यात आली, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री मुहम्मद सोहेल आफ्रिदी यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.
