Pakistan Warns Israel After Tehran Embassy Area Attack: इराणची राजधानी तेहरान येथील पाकिस्तानी दूतावासाच्या जवळ इस्रायल-अमेरिकेकडून हवाई हल्ला झाल्याची बाब समोर आली आहे. त्यानंतर पाकिस्तानने त्यांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर इस्रायलला गंभीर इशारा दिला आहे. इराणमध्ये किंवा इतर ठिकाणी त्यांच्या अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकराचा धोका झाल्यास गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात असे पाकिस्तानने म्हटले आहे.

सरकारशी संबंधित पाकिस्तान स्ट्रॅटेजिक फोरमच्या निवेदनात म्हटले आहे की, “इस्रायलने लक्षात ठेवले पाहिजे की पाकिस्तान हा कतार नाही. जगात कोठेही आमच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना इजा झाल्यास आम्ही त्यांना चांगलेच ठोकून काढू.”

तेहरानच्या मध्य भागातील काही ठिकाणांवर गुरूवारी इस्रायल आणि अमेरिकेने हवाई हल्ले केल्याचे वृत्त समोर आले, यानंतर पाकिस्तानकडून ही धमकी देण्यात आली आहे. या हल्ल्यांमध्ये इराणच्या राजधानीतील पाकिस्तानी दूतावास आणि पाकिस्तानच्या राजदूतांच्या निवासस्थानाच्या जवळच्या परिसराचाही समावेश आहे.

प्राथमिक माहितीनुसार, या हल्ल्यांमध्ये दूतावासाची इमारत आणि पाकिस्तानी अधिकारी यांना कसलीही इजा झालेली नाही, पण जवळपासच्या परिसरातील अनेक इमारती चांगल्याच हादरून गेल्या.

पश्चिम आशियात सुरु असलेले अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामधील युद्धाचा २८वा दिवस सुरू आहे. यादरम्यान, तेहरान, काशान आणि अबादान या शहरांमध्ये अनेक हवाई हल्ले झाल्याचे वृत्त आहे.

पाकिस्तानकडून अमेरिका आणि इराण यांच्यात वाटाघाटी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी जाहीरपणे सांगितले आहे की, दोन्ही बाजूंची इच्छा असल्यास, अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेचे यजमानपद भूषवण्यासाठी पाकिस्तान तयार आहे. असे असतानाच इराणमधील पाकिस्तानी दूतावासाच्या जवळ हे हवाई हल्ले करण्यात आले आहेत.