हेरगिरी प्रकरणात पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्याबाबत पाकिस्तानने एक मोठा निर्णय घेतला आहे. जाधव यांचा खटला आता पाकिस्तान लष्करी कोर्टामध्ये चालवणार नाही, त्या दिशेने प्रयत्न सुरु असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.


पाकिस्तान आपल्या लष्करी कायद्यामध्ये सुधारणा करणार आहे. जर कायद्यात अशी सुधारणा झाली तर जाधव यांना आपल्या अटकेविरोधात दिवाणी कोर्टात अपील करण्याचा अधिकार मिळू शकेल, असे एएनआयने पाकिस्तानी माध्यमातील वृत्ताच्या हवाल्याने म्हटले आहे.

पाकिस्तानने मार्च २०१६ मध्ये हेरगिरीच्या आरोपाखाली कुलभूषण जाधव यांना अटक केली होती. अटक झाल्यापासून पाकिस्तान भारतीय अधिकाऱ्यांना त्यांना भेटण्याची परवानगी देत नव्हता. त्यानंतर पाकिस्तानच्या एका लष्करी कोर्टाने एप्रिल २०१७ मध्ये जाधव यांना हेरगिरी आणि दहशतवादी कारवाईच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, भारताने पाकिस्तानी कोर्टाच्या या निर्णयाला विरोध करीत आंतरराष्ट्रीय कोर्टात आव्हान दिले होते. तिथे या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर यात भारताचा विजय झाला. आंतराराष्ट्रीय कोर्टाने जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देत त्यांना राजकीय मदत देण्याचे निर्देश पाकिस्तानला दिले होते.

गेल्या महिन्यांत आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष न्या. अब्दुलकवी युसूफ यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत सांगितले होते की, पाकिस्तानने भारतीय नागरिक कुलभूषण जाधव प्रकरणात व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केले आहे. त्यांनी १९३ सदस्य देशांच्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत आंतरराष्ट्रीय कोर्टाचा अहवाल सादर केला होता.