शोध आणि मदतकार्यासाठी पाकिस्तानने इटलीस्थित लिओनार्दो-फिनमेक्कानिका या बडय़ा कंपनीशी हेलिकॉप्टर खरेदी करार केला आहे. मात्र फिनमेक्कानिका या कंपनीकडून किती हेलिकॉप्टर खरेदी करण्याचे पाकिस्तानने ठरविले आहे त्याची माहिती उपलब्ध झालेली नाही.
इटलीचे पाकिस्तानातील राजदूत स्टेफानो पॉण्टेकोव्हरे यांच्या उपस्थितीत इस्लामाबादमध्ये ऑगस्टा-वेस्टलॅण्ड कंपनीकडून एडब्ल्यू-१३९ हेलिकॉप्टर खरेदी करण्याच्या कंत्राटावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्याचे कंपनीने बुधवारी स्पष्ट केले.
सदर कंत्राट म्हणजे आपल्या ताफ्याचे टप्प्याटप्प्याने नूतनीकरण करण्याच्या कार्यक्रमाचा एक भाग आहे आणि त्यामध्ये प्रशिक्षणाचाही समावेश आहे, असे दी एक्स्प्रेस ट्रिब्यूनने म्हटले आहे.
शोध आणि मदतकार्यासाठी वापरण्यात येणारी सदर हेलिकॉप्टर पाकिस्तानला २०१७ पासून उपलब्ध करून दिली जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तानकडे यापूर्वीच ११ एडब्ल्यू १३९ हेलिकॉप्टर आहेत, त्यापैकी पाच हेलिकॉप्टरचा वापर सरकार नागरी संरक्षणासाठी करीत आहे. सदर हेलिकॉप्टर १५ आसनांचे असून त्यांचा वापर ३८ देश विविध कारणांसाठी करीत आहेत.
मुल्लाह मन्सूर ठार झाल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब
इस्लामाबाद- अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात तालिबानचा प्रमुख मुल्लाह अख्तर मन्सूर हा ठार झाल्याच्या वृत्ताला पाकिस्तानने गुरुवारी दुजोरा दिला आहे. मन्सूर हा नाव बदलून आणि पाकिस्तानचे बनावट ओळखपत्र तयार करून तो देशात वावरत होता, असेही पाकिस्तानने म्हटले आहे. भाडय़ाने घेतलेल्या एका मोटारीतून २१ मे रोजी बलुचिस्तानातील नोशकी जिल्ह्य़ातून क्वेट्टा येथे जात असताना मन्सूरला अमेरिकेच्या विशेष दलाच्या ड्रोनने लक्ष्य केले.