इस्लामाबाद : पाकिस्तानचे राजदूत सोहेल महमूद यांना परत भारतात पाठवण्यात येणार असल्याचे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शहा महमूद कुरेशी यांनी म्हटले आहे.

त्यांनी सांगितले, की पुलवामा हल्ला, त्यानंतर भारत व पाकिस्तान यांनी एकमेकांवर केलेले हल्ले प्रतिहल्ले यानंतर तणाव कमी करण्यासाठी भारताशी वाटाघाटी करण्यास आमची तयारी आहे. अमेरिका, चीन, रशिया या देशांनी भारत व पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. ते म्हणाले, की आताची वेळ संघर्ष संपवून शांततेकडे वाटचाल करण्याची आहे. पाकिस्तान भारताबरोबरचे सर्व प्रश्न निकाली काढू इच्छितो त्यामुळे शांतता प्रक्रियेतील अडथळे दूर होणार आहेत. भारत व पाकिस्तान यांच्यातील तणाव हळूहळू कमी होत असून सकारात्मक वातावरण तयार होत आहे. पाकिस्तानने त्यासाठी राजनैतिक संबंध वाढवले असून पाकिस्तानचे उच्चायुक्त सोहेल महमूद यांना पुन्हा दिल्लीला पाठवण्यात येत आहे.

पाकिस्तानने पुलवामा हल्ल्यानंतरच्या घटनाक्रमात महमूद यांना सल्लामसलतीसाठी माघारी बोलवले होते. भारतानेही राजदूत अजय बिसारिया यांना माघारी बोलावले होते.

पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारीला पाकिस्तानात बालाकोट येथे हवाई हल्ले केले होते त्यानंतर पाकिस्तानने काश्मीरमध्ये हल्ले करून त्याला प्रत्युत्तर दिले होते.

तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेने पडद्याआडून प्रयत्न केले, असे कुरेशी यांनी सांगितले. चीन, रशिया, तुर्की, संयुक्त अरब अमिरात व जॉर्डन यांच्या राजदूतांनीही तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न केले, आता पाकिस्तानी शिष्टमंडळ भारतात जात असून त्यात कर्तारपूर मार्गिकेविषयी संवाद सुरू करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.