‘घातपाती कारवायां’मध्ये सहभाग असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले कथित भारतीय गुप्तहेर कुलभूषण जाधव यांना राजदूतावासाशी संपर्क साधू देण्याची (कॉन्सुलर अॅक्सेस) भारताची विनंती पाकिस्तानने फेटाळून लावली आहे. भारताचे हेर असलेले कुलभूषण यांनी विशिष्ट कारणासाठी पाकिस्तानमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांना राजदूतावासाशी संपर्क साधण्याची संधी उपलब्ध न करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे पाकचे अंतर्गत मंत्री निसार अली खान यांनी पत्रकारांना सांगितले. गेल्या मार्चमध्ये पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी जाधव यांना बलुचिस्तानातून अटक केली होती. ते भारतीय नौदलातील अधिकारी असून त्यांना ‘रॉ’ या भारतीय गुप्तचर संस्थेत नेमण्यात आले असल्याचा दावा पाकने केला होता. त्यांनी पाकिस्तानात ‘घातपाती कारवायां’चे नियोजन केल्याचाही त्यांच्यावर आरोप होता. जाधव यांनी पूर्वी भारतीय नौदलात काम केले असून त्यांनी मुदतपूर्व सेवानिवृत्ती घेतली आहे, मात्र त्यांचा सरकारशी काही संबंध नसल्याचे भारताने स्पष्ट केले होते. मात्र त्यांना राजदूतावासाशी संपर्क साधू देण्याची मागणी केली होती.