पीटीआय, नवी दिल्ली

सिंधू जलकरार स्थगित करण्याचा भारताचा निर्णय हा पाकिस्तानने मैत्री आणि सद्भावना तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा नैसर्गिक परिणाम असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने संसदीय समितीला दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

पाकिस्तानकडून सुरू असलेला सीमेपलीकडून होणारा दहशतवाद कराराच्या तरतुदींनुसार अंमलबजावणी करण्यापासून भारताला रोखत असल्याची माहितीदेखील मंत्रालयाने दिली.

अभियांत्रिकी तंत्रज्ञान, हवामान बदल आणि हिमनद्यांचे वितळणे यासह भौगोलिक परिस्थितीत बदल झाल्यामुळे कराराच्या अटींवर पुन्हा चर्चा करणे आवश्यक झाले असल्याची माहितीदेखील मंत्रालयाने दिली.

दरम्यान, पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानची भूमिका आणि दहशतवादाविरुद्ध भारताच्या कठोर भूमिकेबद्दल आंतरराष्ट्रीय समुदायाला माहिती देण्यासाठी ३३ देशांच्या राजधानींना भेट देणारे सर्वपक्षीय शिष्टमंडळदेखील सिंधू जलकरार स्थगित करण्याच्या नवी दिल्लीच्या निर्णयाचे समर्थन करण्यासाठी हाच युक्तिवाद करतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चर्चेत पाककडून अडथळा

करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर भौगोलिक परिस्थितीत झालेल्या बदलांमुळे दोन्ही सरकारांमधील चर्चेच्या भारताच्या विनंतीला पाकिस्तान सतत अडथळा आणत असल्याची माहितीदेखील मंत्रालयाने समितीला दिली. सिंधू जलकरार १९५० आणि १९६० च्या दशकातील अभियांत्रिकी तंत्रज्ञानावर आधारित असल्याने तो २१व्या शतकासाठी योग्य बनवण्यासाठी त्यावर पुन्हा चर्चा करण्याची आवश्यकता असल्याचेदेखील परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.