अमेरिकी शोध पत्रकार सेमूर हर्श यांचा दावा
अल कायदाचा दहशतवादी ओसामा बिन लादेन याला ठार करण्याची जी मोहीम अमेरिकेने आखली होती त्याची सगळी कल्पना पाकिस्तानला होती असा दावा अमेरिकी पत्रकाराने केला असून त्याचे नवे पुरावे दिले आहेत. अल कायदा नेत्याच्या ठिकाणावर छापा टाकून त्याला ठार करण्याच्या मोहिमेची माहिती नव्हती असा पाकिस्तानने अनेकदा दावा केला आहे.
अमेरिकी शोध पत्रकार सेमूर हर्ष यांनी सांगितले की, पाकिस्तानला लादेनवरील २०११ मध्ये झालेल्या कारवाईची पूर्वकल्पना होती व पाकिस्तानी लष्कराच्या प्रशिक्षण शाळेजवळ अबोटाबाद शहरात लादेनच्या घरावर अमेरिकेने नेव्ही सील्सच्या मदतीने हल्ला करून त्याचा खातमा केला होता. लादेन हा अल कायदाचा संस्थापक होता व त्याने ११ सप्टेंबरच्या अमेरिकी हल्ल्यांची जबाबदारीही स्वीकारली होती. डॉन या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हर्श यांनी सांगितले की, गेल्या वर्षांत आणखी एक पुरावा हाती आला असून त्यानुसार अमेरिकेने लादेनला ठार मारण्याच्या मोहिमेचे जे काही तपशील दिले आहेत ते खोटे आहेत. पाकिस्तानने लादेनला २००६ मध्ये स्थानबद्ध केले त्याला कैदी बनवले त्यासाठी सौदी अरेबियाचा पाठिंबा होता. अमेरिका व पाकिस्तान यांच्यात समझोता होता त्यानुसार लादेनच्या अबोटाबाद येथील ठिकाण्यावर छापा टाकण्यात आला पण पाकिस्तानने मात्र आपण त्या गावचेच नाही असा आविर्भाव आणला. भारतामुळे पाकिस्तान सतत सतर्क होता. त्यांचे रडार्स एफ १६ विमानांचे निरीक्षण करीत होते पाकिस्तानच्या परवानगीशिवाय अमेरिकी हेलिकॉप्टर्स तेथे घुसणे शक्य नव्हते.
लादेनला मारण्यात पाकिस्तानने मदत केली असे अजूनही तुम्हाला वाटते का, यावर हर्श म्हणाले की, हो यात काही शंकाच नाही. हर्श यांचा याबाबतचा पहिला लेख प्रसिद्ध झाला तेव्हा वॉशिंग्टनमध्ये खळबळ उडाली व व्हाइट हाऊसने ते वृत्त चुकीचे असल्याचे सांगितले होते. अनेक प्रसारमाध्यमांनी ते वृत्त चुकीचे असल्याचा पवित्रा घेतला.
द किलींग ऑफ ओसामा बिन लादेन या पुस्तकात हर्श यांनी हा दावा कायम ठेवला आहे, हे पुस्तक या आठवडय़ात प्रकाशित होत आहे. तेव्हाचे लष्करी व आयएसआय अधिकारी यांनी अमेरिकेशी गुप्त समझोता केला होता त्यामुळे इतर लष्करी अधिकारी नाराज होते.
पाकिस्तानचे तेव्हाचे हवाई संरक्षण प्रमुख नाराज होते. डेमोक्रसी नाऊला दिलेल्या मुलाखतीत हर्श यांनी सांगितले की, ऑगस्ट २०१० मध्ये पाकिस्तानी कर्नल आमच्या दूतावासात आला व तो सीआय स्टेशन प्रमुख जोनाथन बँक यांच्याकडे गेला, त्यानेच लादेन चार वर्षे पाकिस्तानात असल्याचे गुपचूप सांगून टाकले.