पीटीआय, नवी दिल्ली : भाजपने शनिवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर विदेशी भूमीवर भारताविरुद्ध बोलल्याबद्दल जोरदार टीकास्त्र सोडले. राहुल यांनी देशातील परिस्थितीबद्दल केलेले आरोप करण्याची हिंमत पाकिस्तानातही नाही, असे भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी शनिवारी केले.
पात्रा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जग भारताची प्रशंसा करत असताना, देशाचे प्रमुख विरोधी पक्षाचे नेते देश उद्ध्वस्त झाल्याचा व भारतात लोकशाही नसल्याचा दावा विदेशात करत आहेत. तर देशात न्यायव्यवस्था व प्रसारमाध्यमांची अवस्था वाईट असल्याचा राहुल यांचा दावा आहे. जेव्हा भारत जी-२० गटाचे अध्यक्षपद भूषवत आहे, तसेच जग भारतात गुंतवणुकीसाठी आकर्षित होत असताना, परदेशी कंपन्या चीन सोडून भारतात गुंतवणुकासाठी येत असताना राहुल गांधी या गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करण्यास परावृत्त करण्यासाठी अशी वक्तव्ये करत आहेत असा आरोप पात्रा यांनी केला.