भारताच्या अटी आणि शर्तीवर त्यांच्याशी चर्चा केली जाणार नाही आणि चर्चेच्या विषयपत्रिकेत काश्मीर आणि जलतंटय़ाच्या विषयांचा अंतर्भाव नसल्यास चर्चाच केली जाणार नाही, अशी दर्पोक्ती पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार सरताज अझिझ यांनी केली आहे.
भारतीय नेत्यांनी केलेल्या पाकिस्तानविरोधी वक्तव्यांचा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान की मून यांच्याकडे उपस्थित केला जाईल, असेही अझिझ म्हणाले. सार्क देशांच्या उच्चशिक्षण आयोगाच्या बैठकीनंतर अझिझ वार्ताहरांशी बोलत होते.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात सौहार्दपूर्ण संबंध शक्य नसले तरी पाकिस्तानला भारतासमवेत तणावमुक्त संबंध हवे आहेत, असेही अझिझ म्हणाले.
पाकिस्तान हा शांतताप्रिय देश आहे आणि भारतासमवेतचे सर्व प्रश्न चर्चेद्वारे सोडविण्याची पाकिस्तानची इच्छा आहे असे त्यापूर्वी सार्क देशांच्या बैठकीत भाषण करताना अझिझ म्हणाल्याचे वृत्त पाकिस्तान नभोवाणीने दिले आहे.