Pakistan Woman Killed by Brothers: आधीच्या दोन पतींचं निधन झाल्यानंतर एका महिलेनं तिसऱ्या विवाहाची इच्छा व्यक्त केली म्हणून तिची हत्या करण्यात आल्याची घटना पाकिस्तानात समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तिच्या सख्ख्या भावांनीच या महिलेची हत्या केली आहे. एएनआयनं पाकिस्तानमधील एआरवाय वृत्तसंस्थेच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तामध्ये या गुन्ह्याचा सविस्तर तपशील दिला आहे. याआधीही पाकिस्तानच्या गुल शहरात एका महिलेनं कौटुंबिक हिंसाचाराला कंटाळून घटस्फोटाची याचिका न्यायालयात दाखल केली म्हणून तिच्या वडिलांनी व काकांनी तिचे पाय कापल्याची घटना घडली होती. घटनास्थळी सापडली ३० पिस्तुलं! कराचीमधील बहादुरबादमध्ये ही घटना घडली. संबंधित महिला तिच्या घरी असताना तिच्या दोन्ही भावांशी तिचा वाद झाला. आपण तिसरं लग्न करण्याचा विचार करत आहोत, असं या महिलेनं तिच्या भावांना सांगितलं असता त्यांच्यात मोठा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की दोघा भावांनी महिलेची गोळ्या झाडून हत्या केली. घटनेची माहिती मिळताच कराची पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी तिथे पोलिसांना घरात ३० पिस्तुलं आणि झाडलेल्या दोन गोळ्यांचे कवच सापडले. यासंदर्भात पुढील तपास केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिल्याचं एआरवायच्या वृत्तात नमूज केलं आहे. दरम्यान, आधीच्या दोन पतींपासून सदर महिलेला एकूण ९ मुलं असून त्यांची जबाबदारीही महिलेनं स्वत: उचलण्याची तयारी दाखवली होती, अशी माहिती आता समोर येत आहे. पाकिस्तान महिलांसाठी असुरक्षित! दरम्यान, काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या गुल शहरात कौटुंबिक हिंसाचाराला कंटाळून घटस्फोटाची याचिका दाखल करणाऱ्या महिलेचे पाय कापण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता. सोबिया बतूल शाह असं या महिलेचं नाव आहे. या महिलेला तिच्या पतीकडून वारंवार मारहाण केली जात होती, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे आपल्याला घटस्फोट हवा असल्याची मागणी तिने केली होती. Pakistan Woman Social Post: “पाकिस्तानमध्ये मुलगी म्हणून जगणं फार कठीण”, तरुणीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल; सांगितला धक्कादायक अनुभव! एकीकडे पतीकडून मारहाण होत असताना दुसरीकडे स्वत: या महिलेचे वडील व काकाच तिच्या विरोधात होते. त्यांच्यातील वाद इतके विकोपाला गेले की तिच्या वडिलांनी पोटच्या मुलीचे पाय छाटले. सोबियाचे वडिल सय्यद मुस्तफा शाह, काका सय्यद कुर्बान शाह व त्यांचे सहकारी एहसान शाह, शाह नवाज व मुश्ताक शाह यांनी सोबियाचे पाय छाटल्यानंतर घरातून पोबारा केला. सोबियाला पोलिसांनी तातडीने रुग्णालयात दाखल केलं असून तिच्यावर उपचार चालू आहेत. दुसरीकडे सय्यद मुस्तफा शाह व सय्यद कुर्बान शाह यांच्यासह इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. नोकरीच्या बदल्यात महिलेकडे शारिरीक सुखाची मागणी दोन दिवसांपूर्वीच पाकिस्तानमधील एका तरुणीनं सोशल मीडियावर टाकलेली पोस्ट व्हायरल झाली होती. त्यात एका बड्या कंपनीच्या नावाने वेबसाईटवर टाकण्यात आलेल्या नोकरीच्या बनावट जाहिरातीमुळे फसवणूक झाल्याचा उल्लेख तिने केला होता. समोरील व्यक्तीने कंपनीत नोकरीच्या बदल्यात तरुणीकडून मॅनेजरसाठी शारिरीक सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक खुलासा या तरुणीनं केला आहे. एक्सवरील अधिकृत अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये महिलेनं संबंधित व्यक्तीबरोबर झालेल्या संभाषणाचे चॅट्सही शेअर केले होते.