भारताने पाकिस्तानमधील बालाकोट येथील जैश-ए-महम्मदच्या तळावर २६ फेब्रुवारीच्या रात्री हवाई हल्ला केला. या हल्ल्यामध्ये अनेक दहशतवाद्यांना कंठस्थान घातले. अंत्यंत गुप्तपणे करण्यात आलेल्या या कारवाईसंदर्भातील काही माहिती एअर मार्शल (निवृत्त) चंद्रशेखरन हरी कुमार यांनी दिली आहे. ग्वाल्हेर एअरबेसवरुन हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली लडाऊ विमानांनी उड्डाण केले मात्र मोहिमेची गुप्तता राखण्यासाठी ही विमाने दिल्ली विमानतळावरील रडारच्या नजरेत येऊ नयेत म्हणून खास उपाय योजना करण्यात आली होती असं हरी कुमार यांनी सांगितले. भारताची विमाने हल्ला करुन परतल्यानंतर पाकिस्तानी हवाई दलाची विमाने दुसऱ्यांनाही हल्ला होईल या भितीने बालाकोटच्या आकाशात फिरत होती असंही हरी कुमार यांनी सांगितले.

गुप्तता कायम ठेवण्यासाठी

बालाकोट हल्ल्यासंदर्भात हरी कुमार यांना ‘दैनिक भास्कर’ वृत्तपत्राला खास मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी भारताच्या या एअरस्ट्राइकबद्दलची माहिती दिली. २१ फेब्रुवारी पासूनच या हल्ल्याची तयारी सुरु करण्यात आल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. “२१ फेब्रुवारी रोजी मी ग्वाल्हेर एअरबेसला जाऊन या हल्ल्यामध्ये सहभागी झालेल्या वैमानिकांना भेट घेतली. त्यावेळेस दिल्ली विमानतळावरुन जाणारी विमाने उंचावर उड्डाण करतात आणि कधीकधी एअर ट्रॅफिकमुळे दिल्लीच्या आकाशात बराच वेळ असतात. तर दुसरीकडे दिल्लीत येणारी विमाने ही खाली असतात. त्यामुळेच या मोहिमेची गुप्तता राखण्यासाठी दिल्ली विमानतळावरील रडारवर हल्ल्यात वापरली जाणारी विमाने येऊन नयेत याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे आम्हाला जाणवले. यासाठी दिल्ली विमानतळावर एका विशेष सरकारी अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली. त्याच्या सांगण्यानुसार रडारवर दिसणाऱ्या या लडाऊ विमानांसाठी वाजलेले ब्लिप (रडारवर येणार एक प्रकारचा संदेश) दूर्लक्षित करण्यात आले,” अशी माहिती हरी कुमार यांनी दिली.

पाकिस्तानची विमाने दिसली आणि…

हवाई हल्ल्यासाठी जेव्हा भारतीय विमाने पाकिस्तानी हद्दीमध्ये शिरली तेव्हा पाकिस्तानमधील मुरीदजवळ (रावळपिंडी जवळील पाकिस्तानी हवाई दलाचा एअरबेस) पाकिस्तानची काही गस्त घालणारी विमाने आणि एक लडाऊ विमान आम्हाला दिसले. त्यांचे हल्ला करणाऱ्या विमानांवरील लक्ष विचलित करण्यासाठी आम्ही दोन सुखोई ३० आणि चार जॅग्वार विमाने बहावलपूरकडे पाठवली. ही विमाने येताना पाहून पाकिस्तानी हवाई दल सतर्क झाले आणि आमचा हल्ल्याचा मार्ग मोकळा झाला. सर्व वैमानिकांनी नियोजित जागा घेतल्या आणि आम्ही अगदी तीन वाजून २८ मिनिटांच्या ठोक्याला हल्ला सुरु केला. चार वाजता हल्ला संपला आणि हल्ल्यात सहभागी झालेली सर्व विमाने भारताच्या पश्चिमेकडे असलेल्या हवाई दलाच्या दोन एअरबेसवर सुखरुप परत आली.

नंतर पाकिस्तानची विमाने बालाकोटवर फिरत होती

भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानी हवाई दलाला धक्काच बसला. हल्ला करुन भारतीय विमाने परतल्यानंतर बालाकोटच्या आकाशात पाकिस्तानी हवाई दलाची काही विमाने फिरत होती. अजून एखादा हवाई हल्ला होईल असे त्यांना वाटत असल्याने बराच वेळ ही विमाने तिथे फिरत होती असं हरी कुमार यांनी सांगितले.