‘ड्रोन हल्ल्यामागे पाकिस्तानी लष्कर’

२७ जूनच्या हल्ल्यातील स्फोटकात जी तांत्रिक निपुणता लागते ती पाकिस्तानी लष्कराने पुरवलेली आहे.

जम्मूतील तळावर ड्रोन हल्ल्यामुळे झालेली हानी. सौजन्य- एएनआय

जम्मू, नवी दिल्ली : जम्मूत हवाई दलाच्या तळावर झालेल्या  ड्रोन हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा हात होता, असे त्या वेळी वापरण्यात आलेल्या स्फोटकांतील प्रेशर फ्यूजमुळे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती सुरक्षाविषयक घडामोडींशी संबंधित सूत्रांनी दिली. हवाई दल तळावर ड्रोनच्या मदतीने स्फोटके टाकण्याची घटना २७ जून रोजी घडली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मूत वेगळ्या पद्धतीने हा हल्ला करण्यात पाकिस्तानी लष्कर किंवा आयएसआय यांनी लष्कर ए तोयबा गटाला मदत केल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रगत स्फोटक यंत्राच्या माध्यमातून स्फोट करण्यात आला होता, त्यात १ किलो आरडीएक्स वापरण्यात आले होते. त्यात इतरही अनेक रसायनांचे मिश्रण तयार करण्यात आले होते. या स्फोटकांमध्ये बॉल  बेअरिंगचाही वापर करण्यात आला होता. २७ जूनच्या हल्ल्यातील स्फोटकात जी तांत्रिक निपुणता लागते ती पाकिस्तानी लष्कराने पुरवलेली आहे. प्रेशर फ्यूजचा त्यात वापर करण्यात आला होता व त्याचा वापर पाकिस्तानी लष्करालाच माहिती आहे, लष्कर ए तोयबा सारख्या दहशतवादी संघटनांना त्यातील ज्ञान नाही. स्फोटक पदार्थ हे जमिनीवर पडल्यानंतरच्या आघाताने पेटावेत व स्फ ोट व्हावा यासाठी प्रेशर फ्यूजचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे स्फोटके जमिनीवर पडून स्फोट झाला. प्रेशर फ्यूजचा वापर साधारणपणे खाणकाम क्षेत्रात केला जातो. रणगाडाविरोधी स्फोटकांचा त्यात समावेश असतो. अशी स्फोटके केवळ पाकिस्तानचे हवाई दलच वापरू शकते त्यामुळे त्यांनीच दहशतवाद्यांना मदत केली असावी. प्रगत स्फोटकांमध्ये प्रेशर फ्यूज हा त्याच्या नाकासारख्या भागात वापरला जातो, त्यामुळे मोठा दाब व बल निर्माण होते. बहुतेक तोफगोळे व इतर साधने या प्रकारचे फ्यूज वापरतात.  त्यामुळे ते आकाशात न फुटता खाली पडल्यावर आघाताने स्फोट करतात.

जम्मू काश्मीरचे पोलीस प्रमुख दिलबाग सिंह यांनी सांगितले, की जम्मूतील हवाई दल तळावरचा स्फोट लष्कर ए तोयबाने घडवला असावा. पाकिस्तानी दहशतवादी संघटनांनी केलेल्या या ड्रोन हल्ल्यांच्या चौकशीची सूत्रे आता राष्ट्रीय तपास संस्थेने हाती घेतली आहेत. सहा मिनिटांच्या अंतराने झालेल्या दोन स्फोटात भारतीय हवाई दलाचे दोन जण जखमी झाले होते. त्यातील एका स्फोटात इमारतीचे वरचे छप्पर उडाले होते. दुसरा स्फोट जमिनीवर झाला होता.

पाकिस्तान सशस्त्र ड्रोन चीन व तुर्कीकडून खरेदी करतो. ड्रोन विमाने तीन तास उडू शकतात व त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीमचा वापर करता येतो. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये वायएसआर काँग्रेसच्या पाच लोकसभा खासदारांनी सरकारला ड्रोनच्या वापराबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचे आवाहन केले होते, कारण त्यांचा वापर अति महत्त्वाच्या आस्थापनांवर हल्ला करण्यासाठी होऊ शकतो.

केंद्रीय गृह राज्यमंत्री जी.के. रेड्डी यांनी असे म्हटले आहे, की ड्रोनच्या वापराबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची गरज आहे. याबाबत केंद्र व राज्य सरकार यांनी सल्लामसलत करणे आवश्यक आहे. मार्च महिन्यात चार लोकसभा सदस्य व एका भाजप नेत्याने अशी विचारणा केली होती, की मानवरहित वाहनांमधून होणाऱ्या हल्ल्यांबाबत सरकारने धोरण ठरवले आहे की नाही हे स्पष्ट करावे. त्यावर नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी असे म्हटले होते, की ड्रोन हल्ले रोखण्यासाठी आम्ही प्रमाण सोपस्कार प्रक्रिया जारी केल्या आहेत.

कोलकात्यात संशयित दहशतवाद्यांना अटक

कोलकाता : जमात-उल-मुजाहिदीन (जेएमबी) या संघटनेच्या ३ संशयित दहशतवाद्यांना दक्षिण कोलकात्यातील हरिदेवपूर भागातून रविवारी दुपारी अटक करण्यात आली.

जेएमबीचे हे  ३ संशयित दहशतवादी गेल्या काही महिन्यांपासून या मध्यमवर्गीय वस्तीत भाडय़ाच्या घरात राहात होते. यामुळे स्थानिक रहिवासी चिंतेत होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर कोलकाता पोलिसांच्या विशेष कृती दलाने (एसटीएफ) त्यांना अटक केली. हे प्रकरण सध्या प्राथमिक टप्प्यावर असून आम्ही त्याचा तपास करत आहोत, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pakistani army behind drone strike zws

ताज्या बातम्या