Mufti Saeed Khan Exposes Pakistani Militants for Exploiting Kashmiri Women: पाकिस्तानमधील बंडखोर काश्मीरमधील महिलांचे पद्धतशीरपणे लैंगिक शोषण करत असल्याचा खळबळजनक दावा पाकिस्तानमधील प्रसिद्ध धर्मगुरूंनी केला आहे. पाकिस्तानचे देवबंदी (पंथ) धर्मगुरू मुफ्ती सईद खान यांनी काश्मीर आणि आपला ढोंगीपणा या विषयावर व्याख्यान देत असताना पाकिस्तानी अतिरेक्यांच्या अत्याचाराची कबुलीच दिली. मुफ्ती सईद खान हे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या जवळचे सहकारी म्हणून ओळखले जातात.

खान यांनी पाकिस्तानच्या बंडखोरांचा काळा चेहरा उघड केला. ते म्हणाले, आपल्याकडे बंडखोरांना धार्मिक योद्धे किंवा मुजाहिदीन म्हटले जाते. पण त्यांनी निर्वासितांच्या छावणीतील महिलांचे एक पोळी देऊन लैंगिक शोषण केले. काश्मीरी महिला आणि मुलींना केवळ एका पोळीसाठी स्वतःचे शरीर द्यावे लागत होते, असा दावा खान यांनी केला.

न्यूज १८ ने सदर वृत्त दिले आहे. तसेच भारतीय गुप्तचर यंत्रणेमधील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खान यांचे विधान हे पाकिस्तानच्या धार्मिक आणि राजकीय व्यवस्थेतील एका महत्त्वाच्या व्यक्तीने दिलेली अंतर्गत कबुलीच आहे. यामुळे पाकिस्तानमधील जिहादची एकप्रकारे पोलखोलच झाली आहे.

न्यूज १८ ला गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, धर्मगुरूंच्या दाव्यामुळे पाकिस्तानच्या प्रॉक्सी युद्धाचा भांडाफोड होत आहे. पाकिस्तानच्या आयएसआयने कशाप्रकारे शस्त्र, अतिरेकी यांचा वापर करून स्थानिक काश्मीरी जनतेचे शोषण केले. आयएसआयकडून बंडखोरांना खतपाणी घातले जात असल्याच्या भारताच्या आरोपाला एकप्रकारे आता बळ मिळत आहे.

गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, धर्मगुरू खान यांच्या विधानामुळे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने तयार केलेल्या अहवालाला एक विश्वासार्हता प्राप्त झाली आहे. विदेशी निधीच्या जोरावर अतिरेक्यांकडून लैंगिक हिंसा आणि स्थानिक जनतेचे कसे शोषण केले जाते, याची माहिती या अहवालात आहे.