Pakistan-Afghanistan War: अफगाणिस्तानातील तालिबान अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की पूर्वेकडील जलालाबाद शहराजवळ एक पाकिस्तानी लढाऊ विमान पाडण्यात आले असून त्याचा पायलट जिवंत पकडण्यात आला आहे. ही माहिती एएफपी वृत्तसंस्थेने दिली आहे. स्थानिक रहिवाशांनी एएफपीला सांगितले की संबंधित वैमानिक विमानातून पॅराशूटच्या साहाय्याने खाली उतरला आणि त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.
“जलालाबाद शहराच्या परिसरात पाकिस्तानी लढाऊ विमान पाडण्यात आले आणि त्याचा पायलट जिवंत पकडण्यात आला,” असे अफगाणिस्तानच्या तालिबान पोलिसांचे प्रवक्ते तैयब हम्मद यांनी एएफपीशी बोलताना सांगितले. पूर्व अफगाणिस्तानातील लष्कराचे प्रवक्ते वहिदुल्लाह मोहम्मदी यांनीही या घटनेला दुजोरा दिला. त्यांच्या मते, अफगाण सैन्याने पाकिस्तानचे जेट विमान पाडून वैमानिकाला जिवंत अटक केली आहे.
१३३ तालिबानी लढवय्ये ठार!
दरम्यान, पाकिस्तानने शुक्रवारी अफगाणिस्तानची राजधानी काबूल आणि दक्षिणेकडील कंधार येथे हवाई हल्ले केल्याचे वृत्त आहे. कंधार हे तालिबानचे सर्वोच्च नेते हिबतुल्लाह अखुंदजादा यांचे मुख्य ठिकाण मानले जाते. पाकिस्तानी सरकारच्या प्रवक्त्याने दावा केला की या कारवाईत १३३ तालिबानी ठार झाले, २०० हून अधिक जखमी झाले आणि अनेक चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या किंवा ताब्यात घेण्यात आल्या.
पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या या हवाई हल्ल्यांपूर्वी, गुरुवारी उशिरा अफगाण तालिबान सैन्याने सीमारेषेवर हल्ला सुरू केला होता. तालिबानने हा हल्ला अफगाणिस्तानवरील पूर्वीच्या पाकिस्तानी कारवाईचा बदला असल्याचे म्हटले आहे.
५५ पाकिस्तानी सैनिक मारल्याचा दावा
पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर अफगाण तालिबान अधिकाऱ्यांनीही सीमापार कारवाया सुरू केल्याचा दावा केला असून, किमान ५५ पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांनी देश सध्या शेजारी राष्ट्रासोबत “खुल्या युद्धाच्या” परिस्थितीत असल्याचे जाहीर केले. गेल्या काही वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये तणाव वाढत असून, सद्यस्थिती ही त्या तणावाची तीव्र पातळी मानली जात आहे.
