पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटाला सामोरा जातोय. देशातील लोकांना अन्नधान्यासाठी भटकावं लागतंय. तिथल्या नागरिकांसाठी रेशन मिळवणं म्हणजे एखादं युद्ध जिंकण्याइतकं अवघड झालं आहे. देशातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये लोकांना पीठ आणि धान्यदेखील मिळत नाहीये. तिथले नागरिक रेशनसाठी भांडतानाचे रेशनच्या गाडीमागे धावतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याचदरम्यान, पाकिस्तानमधील अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक किन्नर नाचताना दिसतोय. असा दावा केला जात आहे की, या किन्नराला रेशनच्या बदल्यात नाचायला लावलं.
व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाकिस्तानमधील गुजरानवाला येथील आहे. पाकिस्तानमधील एक न्यूज वेबसाईट जिओ टीव्ही उर्दूने याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. रेशनच्या बदल्यात सरकारी कर्मचाऱ्यांनी किन्नराला नाचायला लावलं होतं. दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उपायुक्तांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. रिपोर्टनुसार या किन्नराने आरोप केला आहे की, त्याला सरकारी कर्मचाऱ्यांनी रेशनच्या बदल्यात नाचायला सांगितलं होतं. दुसऱ्या बाजुला संबंधित सरकारी कार्यालयातील प्रभारी यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत, ते म्हणाले की, हा व्हिडीओ जुना आहे.
हे ही वाचा >> “कालपासून जेवलो नाही, भुकेने व्याकुळलोय…”, दुकानातली मिठाई खाण्यापूर्वी चोराने लिहिलं हृदय हेलावणारं पत्र
बिकट परिस्थितीने बनवलं ‘कोंबडी चोर’
पाकिस्तान हा देश कंगाल होत चालला आहे. तसेच येथील गरिबांची अवस्था त्याहून अधिक बिकट आहे. त्यामुळेच देशात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. पोट भरण्यासाठी लोक आता कुठेही चोरी करण्यासाठी तयार आहेत. सैन्याचं मुख्यालय असो अथवा सैन्याचं हेड क्वार्टर असो. तिथले लोक कुठेही चोरी करायला तयार आहेत. अलिकडेच तिथल्या काही चोरांनी हेडक्वार्टरमधलं पोल्ट्री फार्म लुटलं. तिथल्या सर्व कोंबड्या चोरून नेल्या. याबद्दल अशी माहिती मिळाली आहे की, एकूण १२ जण शस्त्र घेऊन आत घुसले. तिथल्या कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवून पोल्ट्री फार्ममधील तब्बल ५ हजार कोंबड्या चोरून नेल्या. या कोंबड्यांची किंमत तब्बल ३० लाख रुपये इतकी होती.