अमेरिकेतील बड्या राजकीय नेत्यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप असलेल्या एका पाकिस्तानी नागरिकाने धक्कादायक दावा केला आहे. इराणच्या गुप्तचर यंत्रणेने आपल्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि संयुक्त राष्ट्रातील माजी अमेरिकन राजदूत निक्की हेली यांच्या हत्येसाठी भरती केल्याचा दावा या व्यक्तीने केला आहे.

ब्रुकलिनमधील फेडरल कोर्टात बुधवारी साक्ष देताना ४७ वर्षीय आसिफ मर्चंट या व्यक्तीने आरोप केला की, त्याच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याला या कटात सहभागी होण्यास भाग पाडण्यात आले. “माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. मा‍झ्या कुटुंबाला धमकावण्यात आले होते,” असे त्याने ज्युरींना सांगितले.

मर्चंट याने दोन दोन व्यक्तींना हत्या करण्यासाठी भरती करण्याच प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मात्र तो ज्यांना कॉन्ट्रॅक्ट किलर समजत होता ते प्रत्यक्षात मात्र एफबीआयचे एजंट होते. विशेष म्हणजे, या व्यक्तीने हा कथित हत्येच्या कट पूर्ण करसाठी फक्त ५ हजार अमेरिकन डॉलर्स (जवळपास ४.६ लाख रुपये) ऑफर केले होते, असे वृत्त द न्यूयॉर्क पोस्टने दिले आहे.

२०२४ मध्ये हँडलरने संपर्क साधला

मर्चंट याने तो एक बँकर होता आणि त्याचा केळी निर्यातीचा व्यवसाय बुडाल्याचे सांगितले. तसेच इराणी हँडलरने त्याच्याशी एप्रिल २०२४ मध्ये संपर्क साधला आणि त्याला अमेरिकेत जाण्याच्या सूचना दिल्या. तसेच त्याला एखाद्या व्यक्तीची हत्या करावी लागू शकते असेही सूचित केले होते, असे मर्चंट याने सांगितले. त्याला नंतर ट्रम्प, बायडन आणि हेली अशी तीन संभाव्य टार्गेट्स देण्यात आली होती अशी साक्ष त्याने दिली आहे.

हा कट जेव्हा रचला गेला होता, तेव्हा ट्रम्प आणि बायडन हे दोघे २०२४ च्या अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीमध्ये आघाडीचे उमेदवार होते, तर निक्की हेली यांनी एक महिन्यापूर्वीच या शर्यतीतून माघार घेतली होती.

ऑगस्ट २०२४ मध्ये अटक झाल्यानंतर मर्चंटने दहशतवाद आणि मर्डर-टू-हायर आरोपांमध्ये आपण निर्दोष असल्याचे न्यायालयात सांगितले होते. तसेच त्याने साक्ष देताना सांगितले की, त्याने पहिल्यांदा स्वच्छेने २०२२ च्या अखेरीस आणि २०२३ च्या सुरुवातीला इराणी ऑपरेटिव्ह्जबरोबर काम केले होते. द न्यू यॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, त्याने दावा केला की सुरुवातीला त्याने अमेरिकेचे निर्बंध टाळण्यासाठी त्यांना मनी लाँडरिंगमध्ये मदत केली होती.

मर्चंटने दिलेल्या माहितीनुसार, त्याचा हँडलर, ज्याची ओळख त्याने मेहरदाद युसेफ (Mehrdad Yousef) अशी सांगितले होती, याने नंतर त्याला एक हत्येच्या कटाची अंमलबाजवणी करण्याच्या आणि काही ठराविक कागदपत्रे ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. मर्चंटने न्यायालयात सांगितले की, युसफने, जो त्याच्या मते इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोअरचा सदस्य होता, इराणमध्ये राहणाऱ्या नातेवाईकांना लक्ष्य करत त्याच्यावर सहकार्य करण्यासाठी दबाव टाकला.

मर्चंट म्हणाला की, त्याची दुसरी एक पत्नी आणि तीन मुले हे पाकिस्तानात आहेत, पण त्याने इराणमध्ये असलेली त्याची पत्नी आणि मुलीला थेट धमक्या मिळाल्या होत्या का याबद्दल त्याने माहिती दिली नाही. मात्र, त्याने दावा केला की युसेफ अचानक त्याच्या घराच्या बाहेर आला होता आणि त्यांच्या भेटीदरम्यान त्याने शस्त्रही दाखवले होते. “माझे कुटुंब धोक्यात होते, आणि मला करावेच लागले,” असे मर्चंट याने न्यायालयात सांगितले.

सरकारी वकिलांनी मर्चंटच्या एका बैठकीचा एफबीआयच्या सर्व्हेलन्स कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला व्हिडीओ न्यायालयात दाखवला. हा व्हिडीओ जून २०२४ मध्ये क्वीन्स येथील एका स्वस्त मॉटेलमध्ये झालेल्या एका बैठकीचा आहे. ज्यामध्ये मर्चंट हा एका रिपब्लिकन नेत्याच्या हत्येच्या योजनेवर चर्चा करताना ऐकू येत आहे. हा नेता म्हणजे ट्रम्प असावेत असा तपासकर्त्यांना संशय आहे. “हेच टार्गेट आहे. याचा मृत्यू कसा होईल?” असे न्यायालयात दाखवण्यात आलेल्या फुटेजमध्ये मर्चंट म्हणताना दिसत आहे.

मात्र मर्चंटने ज्युरींना सांगितेल की योजनेची अंमलबजावणी होण्याच्या आधीच त्याला अटक होईल हे त्याने गृहित धरले होते. “मला वाटले नव्हते की मी यात यशस्वी होईन,” असे तो म्हणाला. तसे त्याने पुढे असेही नमूद केले की, तो या कामात स्वच्छेने सहभागी झाला नव्हता.

तसेच त्याने हेही मान्य केले की त्याने कथित मारेकऱ्यांना देऊ केलेली ५ हजार अमेरिकन डॉलर्सची रक्कम ही एखाद्याची हत्या करण्यासाठी खूपच कमी होती. “मला माहिती होते की कोणीही इतक्या कमी पैशांसाठी कोणाची हत्या करणार नाही,” असे त्याने न्यायालयात साक्ष देताना सांगितले.

तसेच मर्चंटने सांगितले की तो पकडला जाणार याचा त्याला अंदाज आला होता, तसेच त्याने दावा केला की त्याचा अमेरिकन अधिकाऱ्यांना या कटाबाबत माहिती देणार होता. “मला अशी जाणीव झाली होती की एक वेळ येईल जेव्हा मी उघडा पडेन आणि मला अटक केले जाईल,” असे तो न्यायालयात म्हणाला.

“मी सरकारला सांगणार होतो,” असेही तो म्हणाला. असे केल्याने याला अमेरिकेचे ग्रीन कार्ड मिळेल, अशी त्याला आशा होती. दरम्यान सरकारी वकिलांकडून मर्चंट याची गुरुवारी उलटतपासणी केली जाण्याची शक्यता आहे. जर तो या प्रकरणात दोषी आढळला, तर त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.