नवी दिल्ली : मुंबई हल्ल्याचा सुत्रधार हाफिज सईद याच्यासोबत रॅलित सहभागी झालेल्या पॅलेस्टिनी राजदूताला पॅलेस्टिन सरकारने पुन्हा पाकिस्तानात पाठवल्याची बातमी खोटी असल्याचा दावा पॅलिस्टिनी सरकारने केला आहे. पाकिस्तानातील माध्यमांमध्ये ही बातमी प्रसिद्ध झाल्याचा हवाला देऊन भारतातील माध्यमांनीही याबाबत बातम्या दिल्या होत्या. मात्र, आम्ही त्या राजदूतांना पुन्हा पाकिस्तानात पाठवलेले नाहीत ते अद्याप पॅलेस्टिनमध्येच आहेत, असे तेथील सरकारने रविवारी स्पष्ट केले.


पाकिस्तानी माध्यमांतून सांगितले जात होते की, पॅलेस्टिनने पुन्हा बोलावलेले राजदूत वालिद अबू अली यांना पुन्हा पाकिस्तानात नियुक्त केले आहे. भारताने नाराजी व्यक्त केल्यानंतरही पॅलेस्टिनने युटर्न का घेतला हे कळू शकले नव्हते. पाकिस्तान उलेमा काऊंसिलचे (पीयूसी) अध्यक्ष मौलाना ताहिर अशरफी यांच्या हवाल्याने पाकिस्तानच्या जियो न्यूजने याबाबत वृत्त दिले होते. यात असे म्हटले होते की, पॅलेस्टिनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांनी अली यांना पुन्हा एकदा पाकिस्तामध्ये आपले राजदूत म्हणून नियुक्त केले आहे. अशरफी यांनी सांगितले की, अली हे बुधवारी पाकिस्तानात पुन्हा परततील आणि पुन्हा आपला कार्यभार स्विकारतील.


मात्र, हे वृत्त खोटे असल्याचे नवी दिल्लीतील पॅलिस्टिनी दूतावासाकडून सांगण्यात आले आहे. पॅलिस्टिनी राजदूतांना पुन्हा पाकिस्तानात नियुक्त करण्यात आल्याची खोटी बातमी आपल्याकडे कशी पोहोचली हे आम्हाला कळले नाही. आमच्या माहितीनुसार, अली अजूनही पॅलेस्टिनमध्येच आहेत. पॅलेस्टिनच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील पाक माध्यमांच्या बातम्या नाकारल्या आहेत.