Pakistan : अमेरिका आणि इराण संघर्षामुळे जगातील अनेक देशांना इंधनाचा तुटवडा जाणवत आहे. तेल वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीत या युद्धामुळे तणाव असल्याने कच्च्या तेलाच्या वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे अनेक देशात इंधनाचा तुटवडा जाणवत आहे. पाकिस्तानमध्येही मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाच्या तुटवड्याचं संकट उभं ठाकलं आहे. सध्या इंधन दरवाढीने पाकिस्तान हवालदील झाल्याचं चित्र आहे.

पाकिस्तानात पेट्रोल ४५० पाकिस्तानी रुपये (PKR) प्रति लिटर आणि डिझेल ५०० पाकिस्तानी रुपये (PKR) प्रति लिटरवर पोहोचलं आहे. दरम्यान, पाकिस्तानमधील महागाई कमी करण्यासाठी आणि इंधनाचे गगनाला भिडलेले दर कमी करण्यासाठी काही दिवसांपासून पाकिस्तान सरकार उपाययोजना राबवत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सरकारी मालकीचे उद्योग आणि स्वायत्त संस्थांमधील कर्मचार्‍यांच्या पगारात ५ ते ३० टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता.

त्यानंतर आता शाहबाज शरीफ यांनी पुन्हा एकदा आणखी एक मोठा निर्णय घेतला असून आता पाकिस्तान सरकारमधील मंत्र्यांचं ६ महिन्यांचं वेतन थांबवण्यात आलं आहे, म्हणजे पुढील सहा महिने पाकिस्तानातील कोणत्याही मंत्र्यांना वेतन दिलं जाणार नाही. इंधन संकटामुळे निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती आणि त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आणि खर्चात कपात करण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स नाऊने दिलं आहे.

पाकिस्तानात इंधनाचे दर गगनाला भिडले

अमेरिका-इराण युद्धाचा पाकिस्तानवर मोठा परिणाम होत आहे. पाकिस्तानचे पेट्रोलियम मंत्री अली परवेझ मलिक यांनी गुरुवारी इंधनाच्या दरात मोठी दरवाढ केली. पाकिस्तानात आता पेट्रोल ४५० पाकिस्तानी रुपये (PKR) प्रति लिटर आणि डिझेल ५०० पाकिस्तानी रुपये (PKR) प्रति लिटरवर पोहोचलं आहे. वृत्तानुसार, पाकिस्तान सरकारने गुरुवारी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर १३७.२४ पाकिस्तानी रुपये आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर १८४.४९ पाकिस्तानी रुपये वाढ केली.

पाकिस्तानला धक्का; यूएईने कर्ज परत करण्याची मागणी केली

अमेरिका-इराण युद्धात पाकिस्तान मध्यस्थी करत आहे. मात्र, या युद्धात मध्यस्थी करायला निघालेल्या पाकिस्तानला आता मोठा धक्का बसला आहे. मध्य-पूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिरातीने (UAE) पाकिस्तानला ३.५ अब्ज डॉलर्सचं कर्ज या महिन्यात परत करण्याची मागणी केली. यूएईने (UAE) पाकिस्तानकडे कर्ज त्वरित परत करण्याची मागणी केल्यानंतर पाकिस्तानने एप्रिल अखेरपर्यंत संपूर्ण ३.५ अब्ज डॉलर्सचं कर्ज देण्याचं आश्वासन दिलं असल्याच्या वृत्ताला एका वरिष्ठ पाकिस्तानी कॅबिनेट मंत्र्याने दुजोरा दिला. वृत्तानुसार अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा फटका जगातील अनेक देशांना बसत आहे. त्यामुळे या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या अनुषंगाने संयुक्त अरब अमिरातीने पाकिस्तानला दिलेल्या कर्जाची त्वरित परतफेड करण्याची मागणी केली आहे.