कतारमधील राफेल फायटर विमानांचा पाकिस्तानी वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी वापर होत असल्याचा आरोप भारतातील फ्रान्सचे राजदूत अलेक्झांडर झेग्लेर यांनी फेटाळून लावला आहे. पाकिस्तानी हवाई दलाच्या वैमानिकांना राफेल फायटर विमाने चालवण्याचे प्रशिक्षण दिले जातेय ही फेक न्यूज आहे असे राजदूत अलेक्झांडर झेग्लेर यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले.

कतारकडे राफेल विमाने सुपूर्द केल्यानंतर नोव्हेंबर २०१७ मध्ये पाकिस्तानी वैमानिकांना ही विमाने चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. मे २०१५ मध्ये कतारने फ्रान्सबरोबर राफेल फायटर विमाने खरेदीचा करार केला. हे वृ्त समोर आल्यानंतर लगेच काँग्रेसचे राष्ट्रीय मीडिया समन्वयक राचित सेठ यांनी चिंता व्यक्त केली.

अमेरिकेतील वेबसाइटने यासंबंधीचे वृत्त दिल्यानंतर भारतीय लष्करी वर्तुळातही चिंता व्यक्त करण्यात आली. भारतात सध्या राफेल फायटर विमानांच्या खरेदीवरुन मोठा गोंधळ सुरु आहे. राफेल खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा विरोधी पक्षांचा आरोप आहे. भारत ५८ हजार कोटी रुपये मोजून फ्रान्सकडून ३६ राफेल विमाने विकत घेणार आहे. राफेल विमानांच्या समावेशामुळे भारतीय वायूदलाची क्षमता कैकपटीने वाढेल. भारताला आपल्या हद्दीत राहून शत्रूच्या तळांना लक्ष्य करणे शक्य होणार आहे.