सरबजितसिंगवरील हल्ल्याचे पडसाद भारतातील तुरुंगात उमटतील व त्याचे परिणाम पाकिस्तानी कैद्यांना भोगावे लागतील या केंद्र सरकारच्या इशाऱ्याला २४ तास उलटत नाहीत तोच शुक्रवारी सकाळी जम्मूतील मध्यवर्ती कारागृहात एका पाकिस्तानी कैद्यावर निर्घृण हल्ला करण्यात आला. सनाउल्ला (५२) असे या कैद्याचे नाव असून तो जबर जखमी झाला आहे. प्रथमत त्याला येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याची प्रकृती अधिकच बिघडल्याने हेलिकॉप्टरने त्याला चंडिगढ येथील पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले.
मूळचा सियालकोट येथील असलेला सनाउल्ला १९९९ पासून जम्मूतील बलवाल कारागृहात बंदिवान आहे. दहशतवाद तसेच अंमलीपदार्थाची तस्करी करण्याच्या आरोपावरून तो जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. तुरुंगात भुयार खोदून पळून जाण्याचा कट रचल्याचाही सनाउल्लावर आरोप आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजता कैदी कारगृह परिसरातील बगिचात काम करत असताना सनाउल्लाचे विनोदकुमार या अन्य एका कैद्याशी खटका उडाला व विनोदकुमारने सनाउल्लाच्या डोक्यात वीट व फावडय़ाचा प्रहार केला. या हल्ल्यात सनाउल्ला जबर जखमी झाला. त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली आहे. सनाउल्लाला तातडीने येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची परिस्थिती चिंताजनक असल्याने त्याला चंडिगढमधील पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कारागृह अधीक्षकांवर कारवाई
या घटनेची गंभीर दखल घेत जम्मू-काश्मीर सरकारने बलवाल कारागृहाचे अधीक्षक रजनी सहगल व अन्य एक अधिकारी यांना निलंबित केले. या घटनेची प्रसंगी विशेष चौकशी करण्याची तयारीही सरकारने दाखवली आहे.




हल्लेखोर माजी सैनिक
सनाउल्लावर हल्ला करणारा विनोदकुमार उत्तराखंडचा रहिवासी असून तो माजी सैनिक आहे.