पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची पुन्हा एकदा आगळीक केली आहे. गेल्या चार दिवसांत पाकिस्तानने आठ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.  मंगळवारी सकाळी जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्य़ातील भारतीय सीमेवरील ठाण्यावर पाकिस्तानने गोळीबार केला. त्याला भारतीय जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले.
सांबा जिल्ह्य़ातील रामगड येथील नारियनपूर सीमा ठाण्यावर सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमाराला पाकिस्तानी रेंजर्सनी गोळीबार केला. पाकिस्तानच्या अश्रफ ठाण्यावरून हा गोळीबार करण्यात आला. त्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे या क्षेत्रात काही वेळ तुफान धुमश्चक्री सुरू होती, असे सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
तथापि, पाकिस्तानच्या गोळीबारात कोणीही मृत अथवा जखमी झाले नाही. पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आल्याने जवानांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शस्त्रसंधीचे उल्लंघन होण्याच्या वाढत्या प्रकारांमुळे सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक सुभाष जोशी यांनी सोमवारी जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमाभागाची पाहणी केली. आंतरराष्ट्रीय सीमेवर जोशी यांनी विद्यमान घडामोडींवर चर्चा केली आणि आपल्या फिल्ड कमांडरना चोख प्रत्युत्तर देण्याच्या सूचना दिल्या. पाकिस्तानकडून होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन याबाबत विशेष चर्चा करण्यात आली. गेल्या ३६ तासांत पाकिस्तानकडून चौथ्यांदा तर गेल्या चार दिवसांमध्ये आठ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे.
पूंछ जिल्ह्य़ातील मेंढर उपविभागातील हमिरपूर आणि बालाकोटेजवळच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैनिकांनी सोमवारी रात्रीपासून गोळीबार सुरू केला. मंगळवारी सकाळी सहा वाजेपर्यंत गोळीबार सुरू होता, असे संरक्षण दलाचे प्रवक्ते एस. एन. आचार्य यांनी सांगितले. पाकिस्तानी सैनिकांनी सोमवारी रॉकेट, तोफगोळे यांचा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील दिगवार, मानकोटे आणि दुर्गा बटालीयन आदी भारताच्या ११ ठाण्यांवर मारा केला.