पाकिस्तानवरील आर्थिक संकट टळण्याचं नाव घेत नाहीये. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या पाकिस्तानकडील परकीय चलन साठा संपण्याच्या मार्गावर आहे. तसेच हा देश मोठ्या प्रमाणात रोखीच्या टंचाईचा सामना करत आहे. याचदरम्यान पाकिसानला आणखी मोठा धक्का बसला आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानचं चलन खूप घसरलं आहे. एका अमेरिकन डॉलरची किंमत २५५ पाकिस्तानी रुपये इतकी झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२५ जानेवारी रोजी पाकिस्तानी रुपयाची किंमत २३० रुपये प्रति डॉलर इतकी होती. २६ जानेवारी रोजी बाजार उघडल्यानंतर पाकिस्तानी रुपयाची आणखी मोठी घसरण झाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात नीचांकी पातळी आहे. पाकिस्तान आधीच महागाई आणि रोखीच्या टंचाईने बेजार झालेला असताना त्यांच्या चलनाची देखील घसरण झाली आहे. गेल्या वर्षभरात आधी महापूर आणि त्यानंतर आर्थिक संकटाने पाकिस्तानचं कंबरडं मोडलं आहे. दरम्यान, भारतीय रुपयाबद्दल बोलायचं झाल्यास एका डॉलरची किंमत ८१.५१ भारतीय रुपये इतकी आहे.

आयएमएफच्या कठोर अटी स्वीकारण्याची तयारी

पाकिस्तानची तिजोरी रिकामी आहे, याचदरम्यान अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपायांतर्गत काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी एका निवेदनात म्हटलं होतं की, त्यांचं सरकार ६ अब्ज डॉलर्सचं रखडलेलं मदत पॅकेज जारी करण्यासाठी आयएमएफच्या कठोर अटी स्वीकारण्यास तयार आहे. पाकिस्तान अनेक देशांकडून मदत मागत आहे. परंतु पाकिस्तानची मदत करण्यासाठी कोणताही देश अद्याप पुढे आलेला नाही.

निधी मिळवण्यासाठी पाकिस्तानचे प्रयत्न

आयएमएफने पाक सरकारला चलन आणि बाजारावरील त्यांचं नियंत्रण हटवण्यास सांगितलं होतं आणि बाजारातील शक्तींना चलन दर ठरवू द्यावेत, असंही सांगितलं होतं. ही अट मान्य करण्यात आली होती. पाकिस्तान सध्या ६.५ अब्ज डॉलर्सचा निधी मिळविण्यासाठी जागतिक संस्थांची मान्यता मिळविण्याचा प्रयत्न करत आहे.

हे ही वाचा >> Russia-Ukraine War : रशियाचा युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला; ११ जणांचा मृत्यू, इतर ११ जखमी

पाकिस्तानमध्ये प्रचंड महागाई

पाकिस्तानमधील राखीव परकीय चलन साठा कमी असल्यामुळे तिथे महागाई वाढली आहे. अन्नधान्य देखील परवडेनासं झालं आहे. पिठाचं एक पाकीट ३,००० रुपयांमध्ये विकलं जात आहे. अन्नासाठी भांडणाऱ्या आणि फूड ट्रकचा पाठलाग करणाऱ्या लोकांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistani rupee slumps to record low of rs 255 per dollar asc
First published on: 27-01-2023 at 11:38 IST