पाकिस्तानचे अणुशास्त्रज्ञ अब्दुल कादिर खान यांच्या कुटुंबीयांची नावे पनामा पेपर्समध्ये आली असून, त्यांच्या चार निकटच्या नातेवाइकांचा त्यात समावेश आहे. त्यांच्या बहामा येथे कंपन्या असल्याचे कागदपत्रात दिसून आले आहे. खान यांचे बंधू अब्दुल कय्युम खान व पत्नी हेंद्रिना, दोन मुली दिना खान व आयेशा खान हे वहादत लिमिटेड कंपनीचे मालक आहेत व ती कंपनी बहामात नोंदलेली आहे असे ‘द डॉन’ या वृत्तपत्राने म्हटले आहे. ‘इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्ट्स’ या संस्थेने जाहीर केलेल्या माहितीशी याचा काही संबंध नाही, तर वहादत लिमिटेड या कंपनीचे नाव संकेतस्थळावर आले आहे. या गटाने जी कागदपत्रे ऑनलाइन टाकली आहेत त्यात अब्दुल कादिर खान यांच्या नातेवाइकांच्या नावाच्या कंपनीचा उल्लेख आहे. जानेवारी १९९८मध्ये म्हणजे त्या वर्षी अणुचाचण्या होण्याच्या आधी या कंपनीची नोंदणी झाली व नंतर १२ ऑक्टोबरला पाकिस्तानातील बंडानंतर ३१ डिसेंबर १९९९ रोजी ही कंपनी निर्लेखित करण्यात आली.