राग माणसाला काहीही करायला भाग पाडू शकतो. रागात एखादी व्यक्ती कोणतं पाऊल उचलेल याचा नेम नसतो. रागाच्या भरात घेतलेल्या निर्णयाचे परिणाम माणसाला आयुष्यभर भोगावे लागतात. आजकाल पालकांनी रागावल्यावर मुलांनी रागाच्या भरात घर सोडल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. अशीच एक घटना पुन्हा समोर आली आहे. मात्र, या घटनेत मुलगा घर सोडून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतात आला आहे. घरात भांडण झाल्यानंतर एक १५ वर्षीय पाकिस्तानी मुलगा सीमा ओलांडून भारतात पोहोचला आहे. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी या मुलाला गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील खावडा येथे भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरुन ताब्यात घेतलं आहे.

या मुलाला रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास १०९९ क्रमांकाच्या खांबाजवळून कुंपण ओलांडण्यानंतर ताब्यात घेण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हा अल्पवयीन मुलगा पाकिस्तानच्या थारपारकर जिल्ह्यातील सिंध साहिचोकचा रहिवासी आहे. घरातील एका सदस्याशी भांडण झाल्यानंतर तो घरातून पळून आला, असे त्याने बीएसएफ अधिकाऱ्यांना चौकशीदरम्यान सांगितले. खावडा येथील आरोग्य केंद्रात त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर मुलाला स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

यापूर्वी दोन अल्पवयीन बहिणी आल्या होत्या भारतात –

२०२०च्या डिसेंबर महिन्यात दोन पाकिस्तानी तरुणी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतात आल्या होत्या. या दोघींना जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातून जवानांनी ताब्यात घेतलं होतं. लैला जबैर आणि सना जबैर या दोघीही पाकव्याप्त काश्मीरच्या अब्बासपूरच्या रहिवासी होत्या. जवानांनी या दोघींना ताब्यात घेतल्यानंतर पूर्ण चौकशी करून त्यांना परत पाकिस्तानकडे सोपवलं होतं. या दोघींनी घरात भांडण झाल्यानंतर रागात घर सोडलं आणि चालत राहिल्या. चालता चालता त्या दोघी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतात पोहोचल्या होत्या.