Pakistan Woman Viral Social Post: महिलांचं व त्यांच्या हक्कांचं संरक्षण हा मुद्दा भारतात अनेकदा चर्चेला येतो. पण भारताप्रमाणेच जगभरातल्या महिलांच्या बाबतीत अशा गोष्टी घडत असल्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. पाकिस्तानमधील एका तरुणीनं नुकतीच तिच्या एक्स हँडलवर केलेली पोस्ट याच कारणामुळे व्हायरल होत आहे. या तरुणीने केलेल्या या पोस्टवर मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. “पाकिस्तानमध्ये एक मुलगी म्हणून जगणं कठीण आहे. हा देश म्हणजे नरक झालाय”, असं या तरुणीनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. घडलेला सगळा प्रकार विशद करतानाच मोबाईल चॅटचे काही स्क्रीनशॉट्सही तिने शेअर केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं घडलं काय?

ही पोस्ट अदिना हिरा नावाच्या एका तरुणीने केली आहे. २३ जुलै रोजी या तरुणीने तिच्या अधिकृत एक्स हँडलवर ही पोस्ट केली असून त्यासोबत काही स्क्रीनशॉट्सही शेअर केले आहेत. पाकिस्तानमध्ये नोकरीसाठीच्या एका वेबसाईटवरील जाहिरातीसाठी तिने अर्ज केला होता. पण त्यानंतर आलेला भयंकर अनुभव या तरुणीने तिच्या पोस्टमध्ये सांगितला आहे. शिवाय, चॅट करणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईल नंबरसह या तरुणीने हे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.

पाकिस्तानमधील गिगा ग्रुप ऑफ कंपनीजसाठीची ही जाहिरात होती. या कंपनीमध्ये नव्याने पदवी उत्तीर्ण झालेल्या तरुणांसाठी नोकरीची संधी उपलब्ध असल्याचं जाहिरातीत नमूद करण्यात आलं होतं. त्यानुसार अदिना हिरा हिने अर्ज केला. त्यानंतर सादम बुखारी नावाच्या एका व्यक्तीने त्याच संकेतस्थळावर तिच्याशी संवाद साधायला सुरुवात केली. त्याने अदिनाला कामाचं स्वरूप समजावून सांगितलं. या संवादाचे स्क्रीनशॉट अदिनानं तिच्या एक्स पोस्टमध्ये शेअर केले आहेत.

अदिना हिरा या तरुणीने व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. (@_dinatweets_ वरून साभार)

आधी वेबसाईट चॅट, नंतर व्हॉट्सअॅप चॅट

दरम्यान, या संभाषणानंतर अदिनाला एका वेगळ्याच क्रमांकावरून या नोकरीसंदर्भात माहिती देण्यात आली. त्यावेळी समोरील व्यक्तीने अदिनाला भलत्याच गोष्टींची मागणी केली. “तुमच्या मॅनेजरच्या पर्सनल असिस्टंट म्हणून तुम्ही काम करणार आहात. त्यामुळे तुम्हाला मॅनेजरच्या सर्व गोष्टींचं नियोजन करावं लागेल. तुम्हाला दीर्घकाळ नोकरी टिकवायची असेल तर तुमच्या मॅनेजरशी ‘कोऑपरेट’ करावं लागेल. मला आशा आहे की मी काय सांगतोय हे तुम्हाला कळलं असेल. जर तुम्हाला हे चालणार असेल तर आपण ही चर्चा पुढे नेऊ. तुम्हाला हवं असल्यास आम्ही तुमच्या राहण्याची व्यवस्था करू. त्याशिवाय पिकअप आणि ड्रॉपचीही व्यवस्था होईल”, असं समोरच्या व्यक्तीनं चॅटमध्ये सांगितलं.

अदिनानं त्यावर ‘कोऑपरेशन’ म्हणजे काय? अशी विचारणा केली असता “मला वाटतं तुम्हाला ते बरोबर समजलं आहे. तुम्हाला तुमच्या मॅनेजरसोबत ‘क्वालिटी टाईम’ घालवावा लागेल”, असं या व्यक्तीने अदिनाला सांगितलं. यानंतर संतप्त झालेल्या अदिनानं समोरील व्यक्तीला शिवीगाळ करून त्याचा नंबर ब्लॉक केला.

सोशल मीडिया पोस्टमध्ये मांडली व्यथा

दरम्यान, अदिनानं हे स्क्रीनशॉट शेअर करून त्यावर सविस्तर पोस्ट केली आहे. “पाकिस्तानमध्ये एक मुलगी म्हणून जगणं फार कठीण आहे. अननुभवी तरुणांसाठी नोकरीच्या जाहिराती देणाऱ्या ‘इंडीड’ या वेबसाईटवर मी अर्ज केला होता. पण त्यावर मला हे मेसेज आले. हे अविश्वसनीय आहे! कुणाला माहिती की आणखी किती निष्पाप मुलींचा गैरफायदा या माध्यमातून घेतला गेला असेल”, असं या पोस्टमध्ये अदिनानं म्हटलं आहे.

अदिना हिरा या तरुणीने वेबसाईटवरील मेसेजचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. (@_dinatweets_ वरून साभार)

“जेव्हा या मुली नोकरी शोधण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा अशा मुलींना एकतर अशी माणसं भेटतात किंवा जर नशीबाने त्यांचे पालक श्रीमंत असतील, तर त्यांच्या ओळखीने त्यांना नोकरी मिळते. हा देश म्हणजे नरक झालाय”, असंही अदिनानं पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

Pakistan News: ठाण्यातील महिलेने केलं पाकिस्तानात जाऊन लग्न; भारतात परतल्यावर म्हणाली, “फेसबुकवर…”

गिगा ग्रुप ऑफ कंपनीजचं स्पष्टीकरण

दरम्यान, ज्या कंपनीच्या नावाने ही जाहिरात देण्यात आली होती, त्या कंपनीकडूनही यावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. या स्पष्टीकरणाचाही स्क्रीनशॉट अदिना हिरानं तिच्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. अशी कोणतीही जाहिरात आपल्या कंपनीकडून काढण्यात आलेली नसून सदर तरुणीशी संवाद साधणारी सादम बुखारी नावाची व्यक्तीही आमच्याशी संलग्न नाही, असं कंपनीनं स्पष्ट केलं आहे. तसेच, यासंदर्भात कंपनीकडून कायदेशीर कारवाई केली जात आहे, असंही कंपनीनं सांगितलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistani woman x post viral claims sexual favor demand for job pmw
Show comments