पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सध्या एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांना ट्विटरने संकटात टाकलं आहे. कारण सर्बियामधल्या पाकिस्तान दूतावासाने इम्रान खान यांच्यावर टीका करणारे ट्वीट केले आहे.

“महागाईने मागील सर्व विक्रम मोडीत काढत असताना, आपण इम्रान खान यांच्याकडून किती काळ अशी अपेक्षा करता की आम्ही सरकारी अधिकारी गप्प बसू आणि गेल्या ३ महिन्यांपासून पगार न देता तुमच्यासाठी काम करत राहू आणि आमच्या मुलांना फी न दिल्याने शाळेतून काढून टाकण्यात आले. हा नवा पाकिस्तान आहे का?” सर्बियातील पाकिस्तानच्या दूतावासाने आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरुन असे ट्वीट करण्यात आले आहे.

“आम्हाला माफ करा, इम्रान खान, आमच्याकडे दुसरा पर्याय उरलेला नाही,” दूतावासाने पाकिस्तानी पंतप्रधानांवरील विडंबन व्हिडिओसह ट्वीट केले. अनेकांनी कमेंट्स करत हे हँडल कोण चालवत आहे आणि खाते हॅक झाले आहे का असे विचारले. तर, काहींनी निराशेतून हे ट्वीट केल्याचं म्हटलं आहे.

पाकिस्तान सरकारने मात्र या ट्वीटवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पाकिस्तान आपलं सार्वभौमत्व सोडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे त्यांनी दूतावासाची मालमत्ता विकून पाश्चिमात्य देशात स्थायिक होणं चांगलं आहे, असंही एका युजरने म्हटलं आहे.