पालघर जिल्ह्य़ात एप्रिल महिन्यात दोन साधुंसह तिघांची जमावाकडून हत्या करण्यात आली त्या प्रकरणाची सीबीआय आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत स्वतंत्रपणे चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणाऱ्या दोन याचिका दाखल झाल्या असून त्याबाबत महाराष्ट्र सरकारला म्हणणे मांडण्याचे आदेश गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले.
न्या. अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे याचिकेवर सुनावणी घेतली. श्री पंच दशबन जुना आखाडय़ाच्या साधूंनी आणि मृत साधूंच्या नातेवाईकांनी केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्याचे पीठाने मान्य केले. या प्रकरणाचा राज्य पोलिसांनी पक्षपातीपणे तपास केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणाची एनआयएमार्फत चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका घन:श्याम उपाध्याय यांनी केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात घेण्यात येणार आहे.
