बंगालच्या उपसागरात पनामा ध्वज असलेलं एक मालवाहू जहाज बुडाल्याची घटना समोर आली आहे. या जहाजात २४ खलाशी (क्रू मेंबर्स) होते अशी माहिती सांगितली जात आहे. ओडिशाच्या किनारपट्टीपासून जवळपास २४० नॉटिकल मैल दूर अंतरावर शनिवारी ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ओडिशामधील पारादीप बंदरामधून लोखंडी साहित्य घेऊन हे जहाज विदेशात निघालं होतं. मात्र, त्यानंतर बंगालच्या उपसागरात हे विदेशी मालवाहू जहाज अचानक बुडाल्याची माहिती समोर आली. यावेळी या जहाजावर पनामाचा ध्वज होता. बंगालच्या उपसागरात शनिवारी ही घटना घडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

वृत्तानुसार, हे जहाज पारादीप किनाऱ्यापासून २४० सागरी मैल अंतरावर बुडालं आहे. या घटनेवेळी या जहाजावर २४ कर्मचारी (क्रू मेंबर्स) होते आणि या कर्मचाऱ्यांपैकी बहुतांश जण हे चिनी नागरिक असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय नौदलाने बचावकार्य सुरू केलं आहे.

तसेच मदतीसाठी तेथील इतर जहाजांनाही सतर्क करण्यात आलं असून युद्धपातळीवर बचावकार्य करण्यात येत आहे. मात्र, आतापर्यंत किती जणांना वाचवण्यात आलं? याची माहिती कळू शकलेली नाही. दरम्यान, हे जहाज बुडाल्यानंतर भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय नौदलाने संयुक्त बचाव मोहीम हाती घेत बचावकार्य सुरू केलं आहे. या शोध आणि बचाव कार्यात सहभागी होण्यासाठी तटरक्षक दलाची ‘वरद’ आणि ‘अनमोल’ ही जहाजे तैनात करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.