पनामा पेपर्स: अमिताभ बच्चन यांच्या कंपनीने अजिताभ यांच्याकडून जहाज विकत घेतल्याचे वृत्त फेटाळले

‘एम व्ही निल डेल्डा’ नावाचे जहाज ‘निल शिपिंग लिमिटेड’ कंपनीच्या मालकीचे होते

अमिताभ हे चार कंपन्यांचे संचालक असलेल्या ट्रॅम्प शिपिंग लिमिटेड कंपनीचे संचालक होताच या कंपनीने १९९४ साली अमिताभ बच्चन यांचे भाऊ अजिताभ बच्चन हे सह-मालक असलेल्या कंपनीकडून जहाज खरेदी केल्याची माहिती उघड

जगभरात खळबळ उडवून दिलेल्या पनामा पेपर्समध्ये (Panama Papers)  नमूद केल्याप्रमाणे आपला कोणत्याही परदेशी कंपनीशी संबंध नाही, असा दावा करणाऱ्या अमिताभ यांच्याविरोधात आता आणखी एक पुरावा पुढे आला आहे. अमिताभ संचालक असलेल्या परदेशी कंपनीने त्यांचा भाऊ अजिताभ बच्चन यांच्या कंपनीकडून जहाज खरेदी केल्याचे ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने पडताळून पाहिलेल्या रेकॉर्ड्सवरून समोर आले आहे.
अमिताभ हे चार कंपन्यांचे संचालक असलेल्या ट्रॅम्प शिपिंग लिमिटेड कंपनीचे संचालक होताच या कंपनीने १९९४ साली अमिताभ बच्चन यांचे भाऊ अजिताभ बच्चन हे सह-मालक असलेल्या कंपनीकडून जहाज खरेदी केल्याची माहिती उघड झाली आहे. याआधी हे ‘एम व्ही निल डेल्डा’ नावाचे जहाज ‘निल शिपिंग लिमिटेड’ कंपनीच्या मालकीचे होते. त्यानंतर ते १९९० साली अजिताभ बच्चन यांनी दिवंगत मेहरनूश खजोटिया आणि लंडनस्थित वकिल सरोश जायवाला यांच्यासोबत भागीदारीने सुरू केलेल्या कंपनीने विकत घेतले होते.

दरम्यान, अमिताभ यांनी हे जहाज खरेदी केल्याच्या प्रश्नांवर अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही, तर अजिताभ बच्चन यांनी जहाज विक्रीबाबतच्या आरोपांचे खंडन केले आहे. अजिताभ यांनी एका ई-मेल द्वारे आपले स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, मी गेल्या २० वर्षांपासून अनिवासी भारतीय आहे. ९० च्या दशकात मी कायदेशीररित्या शिपिंग व्यवसायात कार्यरत होतो. पण माझा भाऊ अमिताभ याचा माझ्या व्यवसायाशी कोणताही संबंध नाही.

अजिताभ यांनी पनामा पेपर्स संदर्भात समोर आलेली ही नवी माहिती फेटाळून लावली असली तरी अमिताभ यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. याआधी अमिताभ यांनी ते संचालक असलेल्या परदेशी कंपन्यांच्या संचालक मंडळाच्या बैठकीत टेलिकॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतल्याचे उघडकीस आले होते. ट्रॅम्प शिपिंग लिमिटेड आणि सी बल्क शिपिंग कंपनी लिमिटेडच्या ( ब्रिटीश व्हर्जिन आइसलँड) संचालक मंडळाची ही बैठक १२ डिसेंबर १९९४ रोजी झाली होती. याशिवाय, या दोन्ही कंपन्यांकडून जारी करण्यात आलेल्या इन्कम्बसी सर्टिफिकेटमध्येही अमिताभ यांच्या नावाचा उल्लेख होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Panama papers firm amitabh bachchan denied link to acquired ship from his brother

ताज्या बातम्या