जर्मनीतील बेरेनबर्ग या खासगी बँकेने लोकांना कर चुकवून परदेशात पैसा पाठवण्यास मदत केल्याची बाब पनामा पेपर्समधून निदर्शनास आली आहे.  काळ्या पैशाच्या प्रकरणात जर्मनी, स्वित्र्झलड व लक्झेमबर्ग येथील बँकांच्या अधिकाऱ्यांनी मदत केली, असा आरोप करण्यात आला असून त्याची चौकशी जर्मनीचे अधिकारी करीत आहेत, असे ‘डेर स्पिघेल’ या नियतकालिकाने म्हटले आहे. बेरेनबर्ग बँकेचे प्रमुख हॅन्स वॉल्टर पीटर्स यांनी अलीकडेच जर्मन खासगी बँक असोसिएशनचे अध्यक्षपद स्वीकारले आहे, त्यांच्यावरही चौकशीत संशय आहे. बेरेनबर्गच्या प्रवक्तयाने सांगितले, की बँक अभियोक्तयांच्या संपर्कात आहे पण पीटर्स यांची न्यायालयीन चौकशी सुरू झालेली नाही. अभियोक्तयांच्या कार्यालयाकडून प्रतिक्रिया मिळू शकली नाही. पीटर्स यांनी खासगी बँक संघटनेचे अध्यक्षपद मावळते प्रमुख व डॉइश बँकेचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी ज्युरगन फिटशेन यांच्याकडून घेतले आहे. फिटशेन हे २००२ मधील किर्च मीडिया प्रकरणाच्या घोटाळ्यात अडकले असून त्यात कायदेशीर कारवाई सुरू आहे. पनामा पेपर्समध्ये हॅम्बर्ग येथील बेरेनबर्ग या बँकेचे नाव अनेकदा आले असून या बँकेने परदेशात काळा पैसा पाठवण्यात लोकांना मदत केली होती. इतरांप्रमाणेच आम्ही लोकांच्या परदेशातील खात्यांचे व्यवस्थापन करतो, असे बँकेने गेल्या आठवडय़ात सांगितले होते. दक्षिण अमेरिकेतील एका जागरूक व्यक्तीने याबाबत माहिती दिली होती, पण अर्थमंत्री वुल्फगँग शॉबल यांनी त्याकडे दुर्लक्ष केले असा आरोप असून अर्थ मंत्रालयाने तो आरोप फेटाळला आहे. आम्हाला संपूर्ण पारदर्शकता हवी आहे व चौकशीत सहकार्य न करणाऱ्या देशांना काळ्या यादीत टाकावे, असे शॉबल यांनी म्हटले आहे.