Panchkula School PUBG Assault Case : पंचकुला येथील एका शाळेत ६ वर्षांच्या चिमुरडीवर अत्यंत निर्घृणपणे हल्ला करणाऱ्या ८ वर्षांच्या मुलाला पब्जी आणि इतर हिंसक व्हिडिओ गेम्स खेळण्याची सवय होती, यामुळे त्याच्या वर्तनावर परिणाम झाला असावा, असा दावा पीडितेच्या काकांनी केला आहे. या हल्ल्यामागे हिंसक गेम्सचा काही संबंध आहे का, यादृष्टीने पोलीस सध्या तपास करत आहेत.

या मुलाची चंदीगडमधील ‘जीएमसीएच-३२’ रुग्णालयात मानसशास्त्रीय तपासणी करण्यात आली असून, सोमवारपासून त्याची रवानगी अंबाला येथील निरीक्षण गृहात करण्यात आली आहे. पोलीस आता रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालाची वाट पाहत आहेत. दरम्यान, जखमी मुलगी चंदीगडच्या पीजीआयएमईआर रुग्णालयात उपचार घेत असून तिची प्रकृती सुधारत आहे. मुलीच्या भविष्यासाठी, शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी योग्य ती मदत व नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी तिच्या कुटुंबाने केली आहे.

वादाची सुरुवात आणि वर्गखोलीतील धक्कादायक प्रकार

पीडितेच्या काकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाचे वडीलसुद्धा मुलाला गेम खेळण्याचे व्यसन असल्याचे मान्य करत होते. घटनेच्या दिवशी मुलाने आधी मुलीला ‘वेडी’ म्हटले होते. त्यावर मुलीने ‘मी तुझी तक्रार करेन’ असे म्हटल्यामुळे तो घाबरला. त्यानंतर तुझे बाबा वरच्या मजल्यावर आहेत असे खोटे सांगून तो तिला पहिल्या मजल्यावरील एका रिकाम्या वर्गखोलीत घेऊन गेला. तिथे त्याने मुलीवर गंभीर हल्ला केला. मात्र, पोलीस आणि तपास अधिकारी अजूनही गेमिंगच्या प्रभावाचा तपास करत असून, अधिकृतपणे पब्जी गेम आणि या हल्ल्याचा संबंध अद्याप सिद्ध झालेला नाही.

दरवाजा अडवण्यासाठी ठेवलेली वीट बनली शस्त्र

या घटनेमुळे शाळेच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इतर वर्गातील विद्यार्थ्यांची सुट्टी झाल्यामुळे वर्ग रिकामी होता. वर्गाचा दरवाजा बंद होऊ नये म्हणून तिथे एक वीट ठेवली होती. आरोपी मुलाने त्याच विटेने मुलीवर वार केले. धक्कादायक बाब म्हणजे, वर्गखोलीत मुलगी जखमी अवस्थेत आत असतानाच सुरक्षा रक्षकाने वर्गखोलीला बाहेरून कुलूप ठोकले. शाळेबाहेर विद्यार्थ्यांना सोडणाऱ्या ऑटो चालकाने जेव्हा मुलगी नेहमीच्या ठिकाणी आली नसल्याचे सांगितले, तेव्हा तिच्या वडिलांनीशाळेत धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेज आणि मुलाने दिलेल्या माहितीमुळे मुलगी वेळेत सापडली, अन्यथा ती बराच वेळ तिथेच अडकून राहिली असती. सीसीटीव्हीमध्ये मुलगा मुलीला विटेने आणि डस्टबिनने मारताना, तिचे केस ओढताना आणि बाकावर आपटताना स्पष्ट दिसला आहे. मुलीची अवस्था पाहून तिचे वडील जागेवरच बेशुद्ध पडले होते.

शाळेच्या मुख्याध्यापकांसह शिक्षकांचे निलंबन

या प्रकरणाची गंभीर दखल घेत हरियाणा शिक्षण विभागाने सेक्टर २० मधील या शासकीय शाळेच्या मुख्याध्यापिका आणि दोन शिक्षकांना निलंबित केले आहे. याशिवाय, शाळेच्या प्रशासनाविरोधात बाल न्याय कायदा कलम ७५ आणि भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२५B अंतर्गत निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाची मानसशास्त्रीय चाचणी पूर्ण झाली असून, पोलीस पुढील कायदेशीर कारवाईसाठी अहवालाची प्रतीक्षा करत आहेत. पीडित मुलगी आता उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत असून तिचे कुटुंब तिच्या सुरक्षित भविष्यासाठी प्रार्थना करत आहे.