संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफजल गुरु याचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांकडे देता येणार नाही, या केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद मंगळवारी जम्मू-काश्मीर विधानसभेत मंगळवारी उमटले. पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) आमदारांनी घातलेल्या गोंधळामुळे दिवसभरात सभागृहाचे कामकाज तीनवेळा तहकूब करण्यात आले.
अपक्ष आमदार अब्दुल रशीद यांनी सभागृहातील ध्वनिक्षेपक फेकून दिले. सभागृहातील खुर्च्याही ते फेकण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी मार्शलनी त्यांना धरून सभागृहाच्या बाहेर नेले. पीडीपीच्या काही आमदारांनी पत्रकार कक्षाकडे मोर्चा वळवून त्यांना सभागृहातून बाहेर जाण्यास भाग पाडले.
अफजलचा मृतदेह तातडीने परत द्यावा, अशी मागणी पीडीपीच्या आणि अपक्ष आमदारांनी गोंधळ घालत लावून धरली. अफजलचा मृतदेह परत मागण्यासाठी सभागृहाने ठराव मंजूर करावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. अफजलला गेल्या नऊ फेब्रुवारी रोजी तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली आणि तुरुंगातील नियमांनुसार त्याचा मृतदेह तिथेच पुरण्यात आला आहे. त्यानंतर त्याचा मृतदेह परत देण्याची मागणी त्याच्या कुटुंबियांनी केली आहे.