पीटीआय, श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यात दहशतवाद्यांनी मंगळवारी दोन काश्मिरी पंडित भावांवर जीवघेणा हल्ला झाला. त्यात एक जण मृत्युमुखी पडला, दुसरा गंभीर जखमी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृताचे नाव सुनील कुमार आहे. जखमी झालेल्याचे नाव पिंटू कुमार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलीस प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार शोपियां जिल्ह्यात चोटीपुरा येथे एका सफरचंदाच्या बागेत दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. त्यांच्या गोळीबारात सुनील कुमार मृत्युमुखी पडले. पिंटू कुमार जखमी असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ला झाला त्या घटनास्थळाच्या परिसरास सुरक्षा दलांनी वेढा घातला आहे. पुढील कारवाईबाबतचा तपशील लवकरच जाहीर केला जाईल. काश्मीर खोऱ्यात गेल्या आठवडय़ापासून दहशवाद्यांच्या हल्ल्यांत वाढ झाली आहे. रविवारी नौहट्टा येथे एका पोलिसाची तसेच मागील आठवडय़ात बांदीपुरा येथे एका स्थलांतरित बिहारी कामगाराची हत्या करण्यात आली होती. बडगाम आणि श्रीनगर जिल्ह्यात सोमवारी दोन बॉम्बहल्ले दहशवाद्यांनी केले.

या हत्येचा जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी निषेध केला. उपराज्यपालांनी ‘ट्वीट’मध्ये म्हटले, की शोपियां जिल्ह्यात नागरिकांवर झालेल्या भेकड हल्ल्याच्या वृत्ताने अतीव दु:ख झाले.  दहशतवाद्यांना अद्दल घडवू. ‘नॅशनल कॉन्फरन्स’चे नेते उमर अब्दुल्ला, भाजपचे प्रवक्ते अल्ताफ ठाकूर यांनीही या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.

दरम्यान, कथित ‘काश्मीर फ्रीडम फायटर ग्रुप’ने मंगळवारच्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचे वृत्त असले तरी, हे कृत्य जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे असावे, असा अंदाज सुरक्षा दलांनी व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pandit killed kashmir terrorists kashmiri pandit deathly ysh
First published on: 17-08-2022 at 00:02 IST