पंजशीरही जिंकलं : “देश युद्धातून पूर्णपणे बाहेर पडला असून आता नागरिक शांततेत, स्वातंत्र्यामध्ये आणि…”; तालिबानचा दावा

पंजशीरमध्ये मागील सोमवारपासून तालिबान आणि नॉर्दन अलायन्स आणि माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांच्या फौजांमध्ये युद्ध सुरु झालं होतं.

Taliban Panjshir completely conquered
तालिबानने पत्रक जारी करत यासंदर्भातील माहिती दिलीय.

अफगाणिस्तानमधील पंजशीरच्या खोऱ्यात तालिबान आणि नॉर्दन अलायन्स तसेच माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांच्या फौजांमध्ये सुरु असणारं युद्ध संपुष्टात आल्याची घोषणा तालिबानने केलीय. पंजशीरवर ताबा मिळवल्याचा दावा तालिबानने केलाय. आम्ही हा प्रदेश पूर्णपणे ताब्यात घेतला आहे. याच विजयासोबत अफगाणिस्तानमधील संपूर्ण युद्धविराम लागल्याची घोषणा तालिबानने जारी केलेल्या पत्रकात केलीय. तालिबानचा प्रवक्ता झबीउल्लाह मुजाहिद्दीनने एक पत्रक जारी केलं आहे. “आमच्या शत्रूच्या ताब्यात असणारा पंजशीर प्रांत आम्ही पूर्णपणे ताब्यात घेतलाय. देवाने आणि देशाने दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर देशातील प्रत्येक प्रांताला सुरक्षा पुरवण्यासाठी आम्ही करत असणाऱ्या या प्रय़त्नांना यश आलं आहे,” असं पत्रकात म्हटलं आहे.

नॉर्दन अलायन्ससाठी लढणाऱ्या अनेकांना आम्ही मारहाण केली तर बरेच जण पळून गेल्याचा उल्लेखही या पत्रात आहे. तसेच पंजशीरमध्ये नॉर्दन अलायन्सच्या दबावाखाली असणाऱ्या स्थानिकांची सुटका करण्यात आम्हाला यश आल्याचा आनंद आहे, असा दावाही तालिबानने केलाय. “त्यांची सुटका करण्यात आली आहे. तसेच पंजशीरमधील सर्व नागरिकांचा सन्मान केला जाईल. त्यांच्याशी दुजाभाव केला जाणार नाही. ते सर्वजण आमचे बांधव आहेत. आमच्या देशाची सेवा करणं हे आमचं समान उद्दीष्ट आहे. या नुकत्याच मिळालेल्या विजयामुळे देश युद्धामधून पूर्णपणे बाहेर पडला आहे. आता देशातील नागरिक शांततेत, स्वातंत्र्याच्या वातावरणात आणि मुक्तपणे समृद्धी असणारं जीवन जगतील,” असा विश्वास तालिबानने व्यक्त केलाय.

नक्की वाचा >> तालिबानमधील तरुण पॉर्न वेबसाइट्सवरुन तयार करतायत Kill List; जाणून घ्या काय आहे प्रकरण

तालिबानने पंजशीरचा प्रांत वगळता संपूर्ण अफगाणिस्तावर १६ ऑगस्टपासून ताबा मिळवला. पंजशीरमध्ये मागील सोमवारपासून तालिबान आणि नॉर्दन अलायन्स आणि माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांच्या फौजांमध्ये युद्ध सुरु झालं होतं. तालिबानच्या शेकडो सैनिकांनी मंगळवारी रात्री म्हणजेच ज्या दिवशी अमेरिकेने अफगाणिस्तान सोडलं त्या रात्री पंजशीरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. तालिबानने येथील एक पूल सुद्धा स्फोट करुन उडवला. नॉर्दन अलायन्सकडून लढणाऱ्यांची कोंडी करण्यासाठी तालिबानने हा पूल उडवल्याचं सांगण्यात आलं.

नक्की वाचा >> “…म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी करणे अयोग्यच”; शिवसेनेनं जावेद अख्तर यांना सुनावलं

नक्की वाचा >> तालिबानला युनायडेट नेशन्सकडून मोठा दिलासा

काबूलपासून १५० किमी दूर उत्तरेकडील प्रांताला पंजशीरचं खोरं असं म्हणतात. हा प्रदेश हिंदुकुश पर्वतरांगांमध्ये आहे. उत्तरेकडे या प्रांताची सीमा पंजशीर नदीपर्यंत आहे. पंजशीरचा उत्तरेकडी भाग हा पर्वतांनी वेढलेला आहे. तर दक्षिणेकडे कुहेस्तानचे डोंगर आहेत. हा प्रदेश वर्षभऱ बर्फाच्छादित असतो. यावरुन हे खोरं किती दुर्गम आहे याचा अंदाज बांधता येतो. तालिबानला पंजशीरच्या प्रांतावर ताबा मिळवण्यासाठी नॉर्दन अलायन्ससोबतच येथील भौगोलिक परिस्थितीचाही समाना करावा लागला. अमेरिकेने अफगाणिस्तान सोडल्यानंतरही संघर्ष सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट संकेत सालेह यांनी ३१ ऑगस्ट रोजीच दिले होते. मात्र आता तालिबानने हा संघर्ष संपला असून आपला विजय झाल्याची घोषणा केलीय.

नक्की वाचा >> एक फोटो आणि नाव… जगाला एवढीच ओळख असणारा ‘तालिबान’चा म्होरक्या आणि त्याच्याबद्दलचं गूढ

नक्की वाचा >> तालिबानचा म्होरक्या नाही तर ‘या’ नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करणार अफगाणिस्तानमधील नवं सरकार

अफगाणिस्तानला मिळणार मदत

अफगाणिस्तानमध्ये सत्ता काबीज करणाऱ्या तालिबानला मान्यता द्यावी की नाही यासंदर्भात संयुक्त राष्ट्र संघाची भूमिका स्पष्ट नसतानाच जागतिक स्तरावरील या सर्वात मोठ्या संघटनांपैकी एक असणाऱ्या युएनकडून तालिबानला मोठा दिलासा मिळाला आहे. अफगाणिस्तानला आमची मदत मिळत राहील असं यूएनने स्पष्ट केलं आहे. देशात सरकार स्थापन करण्याआधी तालिबानचा नेता मुल्ला बरादरने रविवारी काबूलमध्ये परराष्ट्र मंत्रालयाच्या मानवी मुल्यांसंदर्भातील विषयांवर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्राचे अवर महासचिव मार्टिन ग्रिफिथ्स यांची भेट घेतली. भेटीनंतर तालिबानचा प्रवक्ता मोहम्मद नईमने ट्विटरवरुन मार्टिक ग्राफिथ्स यांनी संयुक्त राष्ट्रांकडून अफगाणिस्तानला आपलं समर्थन आणि सहकार्य सुरु ठेवणार असल्याचं सांगितलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Panjshir completely conquered afghanistan out of vortex of war taliban scsg