पंजशीर ताब्यात घेतल्याच्या आनंदात तालिबान्यांचा गोळीबार; १७ जण ठार आणि ४० जखमी

काबुलमध्ये शुक्रवारी रात्री तालिबान्यांनी  गोळीबार केल्यामुळे लहान मुलांसह अनेक लोक ठार आणि जखमी झाले आहेत

panjshir Taliban celebratory gunfire Kabul children killed injured
तालिबानने पंजशीर ताब्यात घेतल्याचा दावा केल्यानंतर गोळीबार केला होता (प्रातिनिधीक फोटो/AP)

शेवटचे अमेरिकन सैनिक बाहेर पडल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानला पूर्ण स्वातंत्र्य असलेला देश घोषित केले. २० वर्षे चाललेल्या प्रदीर्घ युद्धानंतर अखेर अमेरिकेने अफगाणिस्तानातून आपले सैन्य मागे घेतले. शेवटच्या अमेरिकन विमानाने अफगाणिस्तान सोडल्यानंतर अफगाणिस्तान अधिकृतपणे अमेरिकन सैन्यापासून मुक्त झाल्याचे तालिबानने म्हटले आहे. अमेरिकन सैन्याचे शेवटच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर तालिबान्यांनी हवेत गोळीबार करत आपला आनंद साजरा केला होता. त्यानंतर पुन्हा काबुलमध्ये शुक्रवारी रात्री तालिबान्यांनी  गोळीबार केल्यामुळे १७ जण ठार तर ४० जखमी झाल्याची माहिती स्थानिक अफगाण वृत्तसंस्थेने दिली आहे.

तालिबानने पंजशीर खोऱ्यावर ताबा मिळवत नॅशनल रेझिस्टन्स फ्रंट ऑफ अफगाणिस्तान (एनआरएफए) चा पराभव केल्याचा दावा केल्यावर शुक्रवारी काबूलमध्ये जोरदार गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामुळे लहान मुलांसह अनेक लोक ठार आणि जखमी झाल्याची माहिती स्थानिक अफगाण वृत्तसंस्था अस्वाकाने दिली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये लोक त्यांच्या जखमी नातेवाईकांना रुग्णालयांमध्ये घेऊन जाताना दिसत आहेत.

“सर्वशक्तिमान अल्लाहच्या कृपेने, संपूर्ण अफगाणिस्तानवर आमचे नियंत्रण आहे. विरोधी दलाचा पराभव झाला आहे आणि पंजशीर आता आमच्या अधिपत्याखाली आहे,” असे रॉयटर्सने तालिबान कमांडरच्या हवाल्याने सांगितले. मात्र, पंजशीरमधील नेते अहमद मसूद यांनी याबाबत माहिती दिली आहे. “पंजशीर विजयाची बातमी खोटी आहे. पाकिस्तानी माध्यमांवर पंजशीर जिंकल्याच्या बातम्या फिरत आहेत. हे खोटे आहे. पंजशीरवर विजय मिळवणे हा माझा शेवटचा दिवस असेल, इंशाअल्लाह,” असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

पदच्युत अमरुल्ला सालेह यांचा मुलगा इबादुल्ला सालेहनेही तालिबानचा पंजशीरवर विजय मिळवण्याचा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. तसेच स्वतःला अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष घोषित करणारे अमरुल्ला सालेहसुद्धा पंजशीरमधून पळून गेल्याचे वृत्त समोर आलं आहे. याबाबत अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती आणि तालिबानला पंजशीरमधून आव्हान देणाऱ्या अमरुल्ला सालेह स्वतः पंजशीरमधल्या परिस्थितीची माहिती दिली आहे. त्यांनी टोलो न्यूजला सांगितले की ते पंजशीर खोऱ्यात आहेत आणि परिस्थिती हाताळत आहे.

वाटाघाटीच्या चर्चा अयशस्वी झाल्यानंतर तालिबानने पंजशीरवर हल्ला केला आहे. या आठवड्यात तालिबान आणि पंजशीर मधील विरोधकांमध्ये जोरदार चकमकी होताना दिसत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Panjshir taliban celebratory gunfire kabul children killed injured abn